esakal | "हाफ मर्डर', दारू पिवून पोलिसांत धिंगाणा; शिक्षकासह दोन ग्रामसेवक निलंबित  
sakal

बोलून बातमी शोधा

zp sangli

दोन ग्रामसेवक आणि एका उपशिक्षक अशा तिघांना आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी निलंबित केले.

"हाफ मर्डर', दारू पिवून पोलिसांत धिंगाणा; शिक्षकासह दोन ग्रामसेवक निलंबित  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः दोन ग्रामसेवक आणि एका उपशिक्षक अशा तिघांना आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी निलंबित केले. पैकी एक ग्रामसेवक आणि एका शिक्षकावर "हाप मर्डर'चा गुन्हा दाखल असून एका ग्रामसेवकाने जत पोलिस ठाण्यात दारू पिवून धिंगाणा घातल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होता. या तिनही प्रकरणांची अतिशय गंभीर दखल घेत कारवाई करण्यात आली. 


जिल्हा परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्‍यातील धुळकरवाडी येथील राघवेंद्र अंकलगे या उपशिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अंकलगे यांच्या बहिणीने काही महिन्यांपूर्वी सांगलीत आत्महत्या केली होती. त्या रागातून त्यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन बहिणीच्या नवऱ्याला गंभीर मारहाण केली होती. या प्रकरणी जत पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. जत तालुक्‍यातीलच सोन्याळ येथे ग्रामविकास अधिकारी असलेल्या बी. एस. बुरुटे यांनी दारुच्या नशेत जत पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. शिवाय, बुरुटे यांच्या कामकाजात गंभीर अनियमितता असल्याचाही अहवाल आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. 


आटपाडी तालुक्‍यातील बाळेवाडी येथील ग्रामसेवक संजय देशमुख यांच्यावर हाप मर्डरचा गुन्हा दाखल आहे. घरगुती वादातून त्यांनी मारहाण केली होती, असा गुन्हा आहे. जूनमध्ये हा प्रकार घडला. तेंव्हापासून ते कामावर आलेले नाहीत. त्यांनी रजेसाठी अर्ज केला होता, मात्र तो नामंजूर करण्यात आला आहे. त्यांना आता निलंबित करण्यात आले आहे. 

बोगस अपंग प्रमाणपत्र 

एका शिक्षिकेने कर्णबधिर असल्याचे प्रमाणपत्र घेऊन लाभ घेतले आहेत. त्यांचे ते प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार गेल्या काही काळापासून करण्यात येत होती. त्याची दखल सीईओ गुडेवार यांनी घेतली आहे. या शिक्षिकेला अपंग असल्याची पुन्हा तपासणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या तांत्रिक सुविधेच्या आधारेच ही तपासणी करून घ्यायची आहे. ज्या कुणी अपंग प्रमाणपत्र सादर केले आहे, अशा सर्वांना ही तपासणी आता बंधनकारक राहील, असेही श्री. गुडेवार यांनी स्पष्ट केले. 

loading image