साताऱ्यात पुन्हा एकेरी वाहतूक

Road
Road

सातारा - ‘ग्रेड सेपरेटर’चे काम व दुहेरी वाहतुकीमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुन्हा एकेरी राग आळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकेरी वाहतूक सुरू होणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी नव्याने ‘पार्किंग झोन’ तयार करण्याबरोबर वाहतूक बंदीबाबतचेही निर्णय घेण्यात आले आहेत.

शहरामधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत थोड्या प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र, पोवई नाक्‍यावर ‘ग्रेड सेपरेटर’चे काम सुरू झाल्यानंतर एकेरीला स्थगिती देण्यात आली. सर्व रस्त्यांवर दुहेरी वाहतूक सुरू झाली. परंतु, त्यामुळेही काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी व्हायला लागली. त्यामुळे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एकंदर वाहतुकीचा आढावा घेतला. त्यानंतर वाहतुकीमध्ये बदल करणारे आदेश काढले आहेत. त्यानुसार शहरात पुन्हा एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी होणार आहे.

नव्या निर्णयानुसार होणारे वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे : राजपथावर शाहू चौक ते मोती चौक एकेरी वाहतुकीसाठी वापरायचा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पथावर मौती चौकाकडून पोवई नाक्‍याकडे जाताना मोती चौक ते पोलिस मुख्यालय हा सर्व वाहनांसाठी एकेरी वाहतुकीसाठी वापरायचा आहे. केसरकर पेठ ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद चौकात आल्यावर अलंकार हॉलकडे (पोलिस करमणूक केंद्र) म्हणजेच उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. लाल बहादूर कॉलेज बाजूकडून पवार टॉवर बिल्डिंग येथून शाहू चौक बाजूला डावीकडे वळण्यास बंदी राहील. 

कमानी हौद ते शेटे चौक हा रस्ता कमानी हौदकडून शेटे चौकाकडे जाण्यासाठी एकेरी असणार आहे. या रस्त्याने गेल्यास शेटे चौकातून शनिवार चौकाकडे डावीकडे वळण्यास बंदी आहे. शनिवार चौक ते देवी चौक हा रस्ता शनिवार चौकाकडून देवी चौकाकडे येण्यास एकेरी असणार आहे.

तसेच या रस्त्याने गेल्यास कमानी हौद बाजूला वळण्यास बंदी आहे. मौती चौक ते गोलबाग, राजवाडा हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे. चांदणी चौक ते समर्थ मंदिर हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने दोन जड वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने कोंडी होत आहे. त्यामुळे एस. टी. बस वगळता या रस्त्यावर जड वाहनांसाठी दोन्ही बाजूने प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

नव्या आदेशानुसार राजधानी टॉवर्ससमोर ‘वनसाइड पार्किंग झोन’ तयार करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण शाखा ते शाहू चौक ते अलंकार हॉल ते मौती चौक रस्त्यांवर सम-विषम तारखांचे ‘पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. मौती चौक ते पोलिस मुख्यालय रस्त्यांवर सम-विषम तारखांचे ‘पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. प्रिया व्हरायटी कॉर्नर ते मनाली हॉटेल रस्त्यावर सम-विषम तारखांचे ‘पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नवीन आर. टी. ओ. ऑफिस चौक ते के. बी. पी. कॉलेज रस्त्यावर सम-विषम तारखांचे ‘पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत.

राजपथावरील कमानी हौद ते शिर्के शाळा जाणाऱ्या मार्गावर कमानी हौद येथील रस्ता अरुंद आहे. त्यामुळे सर्व वाहनांकरिता कमानी हौदाजवळ ‘नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आला आहे. शनिवार पेठेत न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळील सोन्या मारुती मंदिरपासून १०० मीटर अंतरावर चारचाकी वाहनांसाठी ‘नो पार्किंग झोन’, तसेच सोन्या मारुती मंदिर ते नवीन मराठी शाळेसमोरील गेटपर्यंत सर्व वाहनांकरिता ‘नो पार्किंग झोन’ करण्यात आला आहे. साईबाबा मंदिर चौक ते गोडोली पोलिस चौकी रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com