esakal | फसवणूक भरपूर; न्याय मात्र दूर
sakal

बोलून बातमी शोधा

one year complete for kadaknath fraud

घटनेला वर्ष उलटले, तरीही शेतकऱ्यांना अजून न्याय मिळालेला नाही.

फसवणूक भरपूर; न्याय मात्र दूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह जिल्ह्यातील सुमारे सहा हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी महाराष्ट्रातील १३ जिल्हे, तर कर्नाटकातील बेळगावसह तीन जिल्ह्यांत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेला वर्ष उलटले, तरीही शेतकऱ्यांना अजून न्याय मिळालेला नाही. कर्नाटक व महाराष्ट्रातील राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 

हेही वाचा - बेळगावात तब्बल इतके टक्‍के लोक निघाले निगेटिव्हचे पॉझिटिव्ह...

कडकनाथ कोंबडी पालनात बेळगाव जिल्ह्यातील सुमारे २७७ लोकांची फसवणूक झाली आहे; तर सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोपही झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, संकेश्वर, खानापूर, बिडी, गोकाक, निपाणी, बिजगर्णी, बेनकनहळ्ळी, हंगरगा, यळेबैल, कुद्रेमानी, बाची, कडोली, संतीबस्तवाड, बाळगमट्टी, हालगा, बस्तवाड, तारिहाळ, मोदगा आदी गावांतील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. 

कडकनाथ घोटाळ्याची व्याप्ती पाच ते सहा राज्यांत असून घोटाळ्याच्या चौकशीसाठी बेळगाव जिल्ह्यातून मुंबईपर्यंत दुचाकी मोर्चा निघाला होता. इस्लामपुरात आंदोलनही छेडले होते. यामध्ये बेळगावचे शेतकरीही सहभागी झाले होते. या वेळी दोन ते तीन महिन्यांत सर्वांचे पैसे दिले जातील. पक्ष्यांना जगविण्यासाठी खाद्य दिले जाईल, असे आश्‍वासन महाराष्ट्र सरकारने दिले होते. मात्र, याबाबत ठोस पावले उचलली नाहीत.

हेही वाचा - पोलिस उपायुक्‍त यशोदा वंटगुडी यांची बदली; हे आहेत नवे पोलिस उपायुक्‍त...

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) तपास व्हावा, अशी मागणीही यापूर्वी केली आहे. मात्र, सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही झाली. मात्र, या प्रकरणाचा तपास अद्यापही पूर्णत्वाकडे गेलेला नाही. कोरोनामुळे आंदोलन बंद आहे. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा आंदोलन छेडण्यात येणार आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कडकनाथ घोटाळ्यात बेळगाव जिल्ह्यातील सुमारे २७७ जणांची फसवणूक झाली आहे. कोरोनामुळे आम्ही आंदोलन स्थगित केले. कोरोना आटोक्‍यात आल्यानंतर न्याय मिळेपर्यंत आंदोलन केले जाईल. 

-जोतिबा पाटील, शेतकरी

संपादन - स्नेहल कदम 
 

loading image
go to top