उजळाईवाडी येथे गुंडांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

उजळाईवाडी येथे गुंडांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

गोकुळ शिरगाव - उजळाईवाडी येथे खंडणीचा दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी एका पानपट्टी चालकावर हल्ला केला. पानपट्टी चालकास मारहाण करताना अडवण्यास गेलेल्या उमेश बाबूराव माने (वय २५, रा. उजळाईवाडी ता. करवीर) हा गंभीर जखमी झाला. 

खंडणी मागितल्याप्रकरणी जखमी माने यांचा चुलतभाऊ तानाजी माने यांनी चारही गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकारानंतर गाव गुंडाच्या त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गुंडांना पकडून चांगलाच चोप देऊन त्या गुंडांना गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

संशयित विनायक मोहन पाटील, मोहन ऊर्फ चिक्‍या खवरे, अक्षय रामचंद्र पाटील, अलंकार मुळीक, सुनील (पूर्ण नाव माहीत नाही) अशी या संशयितांची नावे आहेत. चार दिवसांपासून चारही खंडणीखोर गावात दहशत माजवत आहेत. धारदार शस्त्र घेऊन बुधवारी रात्री साडेनऊ वाजता नेर्ली तामगाव रोडवरील तानाजी सदाशिव माने यांच्या मोरया पान शॉपीमध्ये गेले. माने यांना ‘दीड महिन्यांपूर्वी एक हजाराचा हप्ता दिलाय, येथून पुढे दर महिन्याला एक हजाराचा हप्ता दे’, म्हणून अलंकार ऊर्फ अलक्‍या अभिजित मुळीक याने वाद घातला, तसेच शिवीगाळ करून मारहाण करू लागला. यावेळी बापूसो मोरे, टिपू रफिक मकानदार याने त्यांना समजून सांगत असताना मुळीक याने मारहाण करत बघून घेण्याची धमकी दिली. 

दरम्यान, गुरुवार दुपारी चार वाजता तानाजी माने याच्या घरी संशयित गुंड तलवारी घेऊन गेले, तानाजी माने गुंडाच्या तावडीतून सुटका करण्याच्या दृष्टीने एका गल्लीतून जात असताना उमेश माने आडवा आला, त्याच्यावर संशयित गुंडांनी हल्ला करून त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे तोडली. 
उमेशवर हल्ला झाल्यानंतर सारा गाव एकत्र झाला. विनायक पाटील याला नागरिकांनी पकडून ग्रामपंचायतसमोर आणून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. माने यांना उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

हद्दपारीची मागणी 
काही दिवसांपूर्वी उजळाईवाडीच्या ग्रामस्थांनी या संशयित गुंडाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गाव बंद करण्याचा इशारा दिला होता; पण पोलिसांच्या मध्यस्थीने व दहशत निर्माण करण्याऱ्यांना मोकाअंतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद मागे घेऊन गुंडांना हद्दपार करण्याची मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com