ज्वारीच्या "या' पट्ट्यात कांद्याला 13 हजारांचा दर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

परतीच्या पावसामुळे दोन एकर कांद्यामधील निम्म्याहून अधिक कांदा खराब झाला. राहिलेल्या कांद्यातून निवडलेल्या कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे उत्पादनखर्च कसा तरी भागवणे शक्‍य होणार आहे. 
- बबलू गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी 

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुका ज्वारी पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु, सततच्या दुष्काळामुळे ज्वारीची पेरणी दिवसेंदिवस कमी होत गेली. यामुळे या परिसरातील शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळाला. आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कांद्याच्या लिलाव प्रक्रियेत यंदाच्या हंगामातील बबलू गायकवाड या शेतकऱ्याच्या उत्पादित कांद्याला प्रतिक्विंटल 13 हजार 331 रुपये असा उच्चांकी दर मिळाला. 

हेही वाचा : सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या यन्नाम; उपमहापौरपदी राजेश काळे 

मंगळवेढा परिसरातील 175 शेतकरी भाजीपाला व इतर उत्पादने जवळची विश्‍वासू बाजारपेठ म्हणून मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिलाव प्रक्रियेसाठी सहभागी होतात. यामध्ये बबलू गायकवाड या शेतकऱ्याच्या कांद्याला मारुती हरी काळे या व्यापाऱ्याने वसंत रामचंद्र चेळेकर यांच्या आडत दुकानातील लिलाव प्रक्रियेत बोली लावत 13 हजार 331 रुपयांचा उच्चांकी दर जाहीर केला. एवढा मोठा उच्चांकी दर जाहीर केल्यानंतर उपस्थित व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी जल्लोष केला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ अवताडे यांनी उच्चांकी दर मिळाल्याने बबलू गायकवाड या शेतकऱ्याचा बाजार समितीच्या आवारात सत्कार केला. 

हेही वाचा : माळशिरसची ऋतुजा भोसले दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत

जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे, मुंबईतील कांदा व्यापारी सुरेश मल्लाळे, कोल्हापूरचे गणेश थोरबोले, सचिव सचिन देशमुख, प्रमोद भगरे, नवनाथ बनसोडे, सचिन चेळेकर, अनिल बोदाडे, ओंकार भोसले, मारुती काळे, सत्यजित सुरवसे, धनाजी पवार, दत्तात्रय कांबळे, परमेश्‍वर इंगळे, अरुण माने, दत्ता शिंदे, विनायक आवताडे, दत्तात्रय टुले आदी उपस्थित होते. दुष्काळी तालुक्‍यातील शेतकरी पारंपरिक पीकपद्धतीत बदल करत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळणारे पीक घेत आहेत. जवळची बाजारपेठ म्हणून मंगळवेढ्याच्या बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. या बाजार समितीने यापूर्वीही वांगे व कांद्याला उच्चांकी दर दिला. याशिवाय तूर, मका, हरभरा आदींचे हमीभाव केंद्र सुरू करून तालुक्‍यासह सांगोला, पंढरपूर, मोहोळ, कर्नाटकातील काही गावांतील शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला दर देण्यासाठी तसेच जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच आणखीन जादा दर देण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. 
- सोमनाथ अवताडे, अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion in this belt costs 13 thousand