Onion crosses one and a half thousand
Onion crosses one and a half thousand

कांदा दीड हजारी पार 

सोनई : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात आज नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. जुन्या कांद्याला मात्र मागणी जास्त असल्याने साडेसोळा हजार आणि नवीन कांद्यास बारा हजार रुपये क्विंटल, असा विक्रमी भाव आजही मिळाला. तीन तासांत दोन कोटी तेरा लाख रुपयांची उलाढाल बाजारात झाली आहे. 

दहा हजार गोण्यांची आवक 
घोडेगाव उपबाजारात नवीन कांद्याची 9863 गोण्या, तर जुन्या कांद्याची 325 गोण्या आवक झाली. एक क्रमांकाच्या जुन्या कांद्यास साडेसोळा हजारांचा भाव मिळाला. क्रमांक दोनला 8500 ते 9500 तर क्रमांक तीनच्या कांद्याला 4500 ते 6500 रुपये भाव मिळाला. नवीन क्रमांक एकच्या लाल कांद्यास आठ ते बारा हजारांचा भाव मिळाला. क्रमांक दोनच्या कांद्यास सहा ते साडेसहा हजार, तर क्रमांक तीनच्या कांद्यास दीड ते साडेचार हजारांचा भाव मिळाला. 

शेतकरी आनंदी 
सोमवारी (ता. दोन) घोडेगाव उपबाजारात साडेतेरा हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाल्यानंतर आजच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष होते. जिल्ह्याबाहेरून आज नव्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होती. या कांद्यालाही चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 

कांद्यातून करोडपती होण्याचा मान 
गोधेगाव (ता. नेवासे) येथील दत्तात्रेय शेळके यांचे एकत्र कुटुंब असून, त्यांनी या मोसमात आतापर्यंत एक कोटी रुपयांची पट्टी घेतल्याचे आडतदार सुदाम तागड यांनी सांगितले. याबाबत दत्तात्रेय शेळके म्हणाले, ""मागील वर्षीही भरपूर कांदा होता; मात्र केलेला खर्चही निघाला नव्हता. मागील अनेक वर्षांत अनेकदा नुकसानच झाले. त्यामुळे कोणीही जादा भावाबद्दल बोटे मोडू नये. या वर्षी स्वप्नातही नव्हते असा भाव मिळाल्याने, काळ्या आईची अधिकाधिक सेवा करण्याची ऊर्जा मिळाली.'' 

पारनेरमध्ये साडेबारा हजारांचा भाव 
पारनेर बाजार समितीत आज सहा हजार पाच गोण्या कांद्याची आवक झाली. त्यात नवीन कांद्याला क्विंटलमागे 12 हजार 551 रुपये आणि जुन्या कांद्याला तेरा हजार रुपयांहून अधिक भाव मिळाल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली. 

गायकवाड म्हणाले, की कांद्याला इतका उच्चांकी बाजारभाव बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच मिळाला आहे. आज नवीन कांद्यात पिंप्री जलसेन येथील सखाराम थोरात यांच्या मालाला सर्वांत जास्त भाव मिळाला. बाजार समितीतर्फे अडते, व्यापारी व उच्चांकी भाव मिळालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपला माल परिपक्व झाल्यावर प्रतवारी करूनच बाजार समितीत विक्रीसाठी 
आणावा व बाजार समितीच्या बाहेर खासगी व्यापाऱ्यांना माल विकू नये, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com