गटशेतीतून 80 एकरवर कांदा लागवड 

गटशेतीतून 80 एकरवर कांदा लागवड 

सोलापूर- शासनाच्या गटशेतीचा फायदा घेत मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल शेतकरी गटाने 80 एकरवर कांद्याची लागवड केली आहे. कांदा लागवडीसाठी आवश्‍यक रोपांची निर्मितीही त्यांनी स्वतःच्या रोपवाटिकेच्या माध्यमातून केली. अशाप्रकारे कांद्याच्या लागवडीचा सोलापूर जिल्ह्यातील गटशेतीचा हा पहिलाच प्रयोग आहे. 

मार्डी येथील लोकमंगल शेतकरी गटाने मार्डी येथील 54 शेतकऱ्यांना एकत्रित करत शेतकरी गटाची स्थापना केली आहे. त्यांनी 100 एकर क्षेत्रावर कांदा लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी 80 एकर कांद्याची लागवडही केली आहे. कांद्याच्या लागवडीसाठी आवश्‍यक असणारे बियाणेही त्यांनी गटाच्या माध्यमातून घेतल्याने एक हजार 200 ते एक हजार 400 रुपये प्रतिकिलो मिळणारे बियाणे त्यांना केवळ 500 रुपये किलोप्रमाणे मिळाले आहे. त्याचबरोबर त्या बियाण्यांपासून रोपे तयार करण्यासाठी त्यांनी स्वःताचीच रोपवाटिका तयार केली. त्यातूनही त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे. मिनी स्प्रिंकलरच्या सहायाने त्यांनी कांद्याची लागवड केली आहे. त्याचबरोबर सामूहिक शेततळे, सामूहिक विहीर पाइपलाइन, कांदा चाळ, कांदा ग्रेडिंग मशिनही या शेतकरी गटाने उभे केले आहे. 

जिल्ह्यात यंदा पाऊसच नसल्याने कांदा लागवडीही अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे या गटाने ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला पाणी देऊन कांद्याची लागवड केली आहे. एकूणच गटशेती केल्याचा मोठा फायदा मार्डीतील शेतकऱ्यांना झाला आहे. 

याशिवाय शासनाच्या गटशेतीचा फायदा शेटफळ (ता. करमाळा) व कडलास (ता. सांगोला) या गावातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेटफळ येथील शेतकऱ्यांनी केळीची तर कडलास येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड केल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. मार्डी येथील गटशेतीला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेटही दिली आहे. त्याचबरोबर या गटातील शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शनही केले. 

गटाने शेती केल्यामुळे उत्पादन खर्चात जवळपास 30 टक्‍यांनी घट होते. उत्पादन खर्च कमी झाल्याने साहजिकच उत्पन्नही वाढते. कांद्याची ग्रेडिंग करण्याची मशिन आठवडाभरात येईल. भविष्यात सौर ऊर्जेवर आधारित कांद्यापासून पावडर तयार करण्याचा उद्योग सुरू करणार आहोत. त्या पावडरला तमिळनाडू येथे बाजारपेठही उपलब्ध आहे. - काशिनाथ कदम, अध्यक्ष, लोकमंगल शेतकरी गट, मार्डी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com