कांद्याच्या क्षेत्रात पाच हजार हेक्‍टरने घट

पांडुरंग बर्गे
बुधवार, 21 डिसेंबर 2016

जिल्ह्यात दराअभावी शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी

कोरेगाव - गतवर्षी कांद्याच्या दरात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील कांद्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्यात सध्या सहा हजार ३५ हेक्‍टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या क्षेत्रात सुमारे पाच हजार हेक्‍टरने घट झाली आहे.

जिल्ह्यात दराअभावी शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी

कोरेगाव - गतवर्षी कांद्याच्या दरात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील कांद्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्यात सध्या सहा हजार ३५ हेक्‍टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या क्षेत्रात सुमारे पाच हजार हेक्‍टरने घट झाली आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आणि खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांमध्ये रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. जलयुक्त शिवार अभियान तसेच सिमेंट साखळी बंधाऱ्यांमुळे दुष्काळी तालुक्‍यांतील अनेक गावांत दोन पिके निघतील, एवढे पाणी उपलब्ध झाले होते. त्यामुळे गतवर्षीच्या रब्बी हंगामात ११ हजार ३८४ हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली होती. मात्र, जानेवारी महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली.

मागील रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होऊन दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. याचा परिणाम खरीप हंगामातील कांदा लागवडीवर झाल्याने कांद्याच्या क्षेत्रात घट झाली होती. खरिपाप्रमाणेच आता रब्बीच्या क्षेत्रातही घट झाली आहे. कांद्याच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकरी कांद्याचे  क्षेत्र कमी करू लागले आहेत. आतापर्यंत माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या पाच तालुक्‍यांत सहा हजार ३५ हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कांद्याचे क्षेत्र सुमारे पाच हजार हेक्‍टरने घटलेले आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे. अजूनही कांद्याची लागवड काही प्रमाणात सुरू असली तरी गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्रातील घट जास्त असणार आहे. दुष्काळी तालुके वगळता सातारा, कऱ्हाड, वाई, जावळी या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांतही कांदा आंतरपीक म्हणून घेतले जाते. या तालुक्‍यात ४०० ते ५०० हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागील रब्बी व खरीप हंगामात शेतकऱ्यांनी दर वाढतील म्हणून अनेक मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला होता. यातील काही शेतकऱ्यांचा कांदा खराब झाल्याने टाकून द्यावा लागला आहे. कांद्याचे दर वाढले की ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे सांगितले जाते. मात्र, कांद्यास दर नाही म्हणून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत असताना सरकारसह सर्वच जण मूग गिळून गप्प बसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.  

खर्च निघणेही अशक्‍य 

जुन्या कांद्यास दहा किलोस ७० ते ११० रुपये, तर नवीन कांद्यास ५० ते ९० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळत आहे. या दरात वाहतूक व इतर खर्च वजा जाता शिल्लक कमी राहते. दर कमी झाले असले तरी भांडवल तेवढेच लागत आहे. मिळणारा दर निराशाजनक असून कांद्यासाठी केलेला खर्चही निघणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Web Title: onion field decrease