कांद्याचा वांदा, क्विंटलला ३८ रुपये हाती !

हरिभाऊ दिघे 
गुरुवार, 14 जून 2018

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील भागवतवाडी (तळेगाव दिघे) येथील एका शेतकऱ्यास कांदा विक्रीतून क्विंटलमागे अवघे ३८ रुपये ६७ पैसे हातात पडले. जयराम सोपान भागवत या शेतकऱ्याच्या कांद्यास उत्पादन खर्च फिटेल इतकी किंमत न मिळाल्याने ते हताश झाले.

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील भागवतवाडी (तळेगाव दिघे) येथील एका शेतकऱ्यास कांदा विक्रीतून क्विंटलमागे अवघे ३८ रुपये ६७ पैसे हातात पडले. जयराम सोपान भागवत या शेतकऱ्याच्या कांद्यास उत्पादन खर्च फिटेल इतकी किंमत न मिळाल्याने ते हताश झाले.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत ता. ७ जून रोजी जयराम भागवत यांनी कांदा विक्रीस नेला होता. आठ गोण्या कांद्याचे वजन ४७३ किलो भरले, त्यास १२५ रुपये क्विंटल भाव मिळाला. तर सोळा गोण्या कांद्याचे वजन ९४९ किलो भरले. त्यास ७५ रुपये क्विंटल भाव मिळाला. आठ गोण्या कांद्याचे ५९१ रुपये २५ पैसे, तर सोळा गोण्या कांद्याचे ७११ रुपये ७५ पैसे झाले. एकूण मिळालेल्या १३०३ रुपयातून आडत, हमाली, तोलाई, वराई असा १५३ रुपये खर्च वजा करण्यात आला. उरलेल्या ११५० रुपयातून ६०० रुपये ( गाडी भाडे ) कापण्यात आले. १४२२ किलो कांद्याचे जयराम भागवत यांच्या हाती ५५० रुपये पडले. अर्थातच त्यांच्या कांद्यास ३८ रुपये ६७ पैसे हातात मिळाले.
 मशागत, कांदा बियाणे, लागवड, खते, खुरपणी, त्यानंतर पुन्हा काढणी, कापणी व विक्रीसाठी कांदा गोण्या असा उत्पादन खर्च लक्षात घेतला तर जयराम भागवत यांना घरातून खर्च करण्याची वेळ आली आहे. उत्पादन खर्च देखील निघणे मुश्कील असे हे कांदा भावाचे हे वास्तव बाजार समितीत्यांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे.

व्यापारी अत्यल्प भावाने शेतकऱ्याचा कांदा खरेदी करीत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुणी वाली उरला नाही. त्यामुळे न्याय कुणाकडे मागायचा? कांद्यास योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात.
- जयराम भागवत, कांदा उत्पादक शेतकरी 

Web Title: onion have very low production cost