कांद्याने कोपरगावकरांच्या डोळ्यात पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

बाजार समितीत खुला कांदा लिलाव रोज सुरू असून, त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली.

कोपरगाव : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.3) कांद्याची 500 क्विंटल आवक झाली. त्यातील 20 क्विंटल कांद्याला 13 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली.

हेही वाचा शिर्डी विमानतळात घुसले अतिरेकी! 

बाजार समितीत खुला कांदा लिलाव रोज सुरू असून, त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज तालुक्‍यातील येसगाव येथील एका शेतकऱ्याच्या 20 क्विंटल 84 किलो कांद्याला 13 हजार 700 रुपये भाव मिळाल्याचे समितीचे सचिव परशराम सिनगर यांनी सांगितले. क्रमांक दोनच्या कांद्याला 11 हजार ते 13 हजार 500 रुपयांचा भाव मिळाला. 

घोडेगावातही साडेतेरा हजार रुपये प्रतिक्विंटल 

दरम्यान, नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव (ता. नेवासे) येथील उपबाजार आवारात सोमवारी (ता.2) कांद्याला साडेतेरा हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला होता. राज्यातील हा विक्रमी भाव असल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीच्या नोंदीनुसार लिलावात अवघ्या दोन तासांत दोन कोटींची, तर व्यापाऱ्यांच्या मते अडीच ते पावणेतीन कोटींची उलाढाल झाली. 

हेही वाचा टोल'नाक्‍यावरील कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला 

नेप्ती, वांबोरीत साडेदहा हजारांपर्यंत भाव 

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात सोमवारी (ता.2) लाल व गावरान कांद्याची एकूण 19 हजार 324 गोण्या आवक झाली. त्यात फक्त 325 गोण्या गावरान कांद्याच्या होत्या. वांबोरी उपबाजारात 1764 गोण्या आवक झाली. त्यात 161 गोण्या गावरान कांद्याच्या होत्या. गावरान कांद्याची आवक मंदावल्याने त्याला दोन्ही ठिकाणी आठ ते दहा हजार रुपये भाव मिळाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion price of Rs 13 thousand 700 per kg