प्रतवारीअभावी कांदा घसरला 

दौलत झावरे 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

गत आठवड्यात कांद्याला सुमारे 9600 रुपयांपर्यंत भाव निघाला होता. रविवारपासून भावातील घसरणीला सुरवात झाली. ती आजही कायम होती. जिल्ह्यातील राहाता व राहुरी बाजार समित्यांमध्ये आज सुमारे 5275 कांदागोण्यांची आवक झाली. राहुरीत 4952, तर राहात्यात 323 कांदागोण्या विक्रीला आल्या. 

नगर : भाव वाढल्याने बाजार समितीमध्ये कमी प्रतवारीचा कांदा विक्रीस येत आहे. त्याचा परिणाम होऊन भावात सुमारे आठशे रुपयांची घसरण झाली. मागणी जास्त व आवक कमी होत असल्याने मागील आठवड्यात विक्रमी भाववाढ झाली होती. पण, चांगली प्रतवारी बाजारात येत नसल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली. 

गत आठवड्यात कांद्याला सुमारे 9600 रुपयांपर्यंत भाव निघाला होता. रविवारपासून भावातील घसरणीला सुरवात झाली. ती आजही कायम होती. जिल्ह्यातील राहाता व राहुरी बाजार समित्यांमध्ये आज सुमारे 5275 कांदागोण्यांची आवक झाली. राहुरीत 4952, तर राहात्यात 323 कांदागोण्या विक्रीला आल्या. 

अतिपावसाने कांदा सडला 
बागायत पट्ट्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा भुसारात भरून ठेवला होता. तर, खरिपाच्या सुरवातील शेतकऱ्यांनी लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु, पावसाळ्यात सुरवातील पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिकच्या पट्ट्यात जास्त पाऊस झाल्याने त्या कांद्याचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यात सुरवतीला कमी पाऊस झाल्याने लाल कांद्याची लागवड झाली होती. परंतु, पावसाळ्याच्या शेवटी अतिपाऊस झाल्याने त्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता बाजारात चांगला कांदा मिळणे दुरापास्त झाले आहे. 

कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भाव 
राहाता : क्रमांक एक : 6500 ते 8700, दोन : 4500 ते 6400, तीन : 2500 ते 4400, गोल्टी कांदा : 4500 ते 5000, जोड कांदा : 2500 ते 3000. 
राहुरी : क्रमांक एक : 7400 ते 8500, दोन : 6500 ते 7395, तीन : 2000 ते 5995, गोल्टी कांदा : 5000 ते 7000. 

त्याचा लिलावावर परिणाम 
चांगला कांदा न राहिल्याने शेतकरी जुना व नवा गावरान कांदा एकत्र करून विक्रीसाठी बाजारात आणतात. व्यापारी तो कांदा खरेदी करतात. परंतु, जुना आणि नवा एकत्र असल्याने तो काही दिवसांत कांदा सडतो. त्याचा परिणाम पुढील लिलावावर होते आणि कांद्याला कमी भाव मिळते. 

प्रतवारी करून कांदा आणा 
शेतकऱ्यांनी जुना व नवा कांदा एकत्र करून विक्रीसाठी आणू नये. कांदा वेगवेगळा प्रतवारी करून आणल्यास चांगला भाव मिळेल. 
- प्रशांत गायकवाड, सभापती पारनेर बाजार समिती 

राहात्यात डाळिंबांची आवक टिकून 
एकीकडे कांद्याच्या भावात घसरण होत असताना राहाता बाजार समितीमध्ये डाळिंबांची आवक व भाव टिकून आहेत. आज 7769 क्रेट डाळिंबांची आवक झाली. मागील आठवड्याप्रमाणेच भाव मिळाला. 
क्रमांक एक : 61 ते 100, दोन : 36 ते 60, तीन : अडीच ते 35 रुपये. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices fell