कांद्याचे भाव पुन्हा निम्म्याने घसरले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

मागणीतही घट ः शेतकऱ्यांचे होत आहे मोठे नुकसान

मागणीतही घट ः शेतकऱ्यांचे होत आहे मोठे नुकसान

कोल्हापूर: राज्यातील बाजारपेठेत कांद्याचे भाव पुन्हा निम्म्याने खाली आले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील कांदा-बटाटा बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली असून दिवसाला शंभर गाडी आवक होत आहे. इतर बाजारपेठांपेक्षा एक ते दोन रुपयांनी जास्त पण उत्पादन खर्चापेक्षा भाव कमी आहेत. यात प्रथम श्रेणीच्या कांद्याला 12 रुपये, तर चतुर्थ श्रेणीच्या कांद्याला दीड रुपयापर्यंत भाव आहे. ज्यांचा कांदा जेमतेम दर्जाचा आहे, त्या कांद्याला चांगला दर मिळेनासा झाला आहे, तर ज्यांचा कांदा चांगला आहे त्यांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात हमखास भाव मिळत आहे.

दोन आठवड्यांपासून पुणे, मुंबई, नाशिक, लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा भाव 1 रुपया ते 10 रुपयांपर्यंत खाली आला. त्याशिवाय तेथे उघड सौद्यांची पद्धत नाही. साहजिकच बिल मिळण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. या तुलनेत कोल्हापुरात कांद्याला भाव चांगला मिळतो व वेळेत पैसेही मिळतात. त्यामुळे नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांतील कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात कांदा आणतात.

गेला आठवडाभर येथील बाजारपेठेत रोज किमान दहा ते वीस गाड्यांची आवक वाढली आहे. अशात येथील बाजारपेठेत कांदा क्षमतेपेक्षा जास्त आला आहे; परंतु येथे असलेल्या कांद्याला पुढे मागणीच नाही. त्यामुळे येथे शिल्लक असलेला कांदा आहेच, त्याशिवाय त्यात नव्या कांद्याची भर पडली आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेतही कांद्याचे भाव कोलमडले आहेत. चांगल्या प्रथम श्रेणीच्या कांद्याचा भाव 15 रुपयांवरून 12 रुपयांपर्यंत खाली आला आहे, तर चतुर्थ श्रेणीचा कांदा 5 रुपयांवरून दीड रुपयापर्यंत खाली आला आहे.

यात शेतकऱ्याला महिन्याच्या तुलनेत दोन ते दहा रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. हा कांदा इतर बाजारपेठेत नेल्यानंतर कदाचित यापेक्षाही जास्त नुकसान होऊ शकते. अशात ज्या शेतकऱ्यांचा कांदा पहिल्या व दुसऱ्या श्रेणीचा आहे त्याचप्रमाणे शेकडा 40 टक्के आहे, तर उर्वरित तृतीय व चतुर्थ श्रेणीचा कांदा असल्याने प्रमाण 60 टक्‍क्‍यांवर आहे. त्यामुळे कांद्याचे खालील भाव अनेक शेतकऱ्यांचे नुकसान करणारे ठरणार आहेत.

कोल्हापुरात कांद्याचे उत्पादन जेमतेम आहे. त्यामुळे कोल्हापुरातून अवघा पाच ते आठ टक्‍के कांदा येथील बाजारपेठेत येतो. उर्वरित सर्व कांदा अन्य जिल्ह्यांतून येतो. हा कांदा येथे आठ ते पंधरा दिवस ठेवून कर्नाटक, गोवा व कोकणात मागणीप्रमाणे पुरवठा केला जातो. सध्या नोटा रद्द झाल्याने कोकण, कर्नाटक, गोव्यातून कांद्याची मागणी कमी आहे.

------------------------------------------------------------------
शाहू मार्केट यार्डात शुक्रवारी कांद्या सौद्यासाठी आलेले नाना धुमाळ (धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी आणलेल्या 443 किलो कांद्याला दीड रुपयाचा भाव मिळाला. वजन, वाहतूक व अन्य कर असा खर्च जाऊन शेतकऱ्याच्या हाती फक्त एक रुपया उरला. गावी परत जाण्यासाठी त्यांच्यावर पदरमोड करावी लागली. शेतकऱ्याने आठ महिने राबून पिकवलेल्या कांद्याला दीड रुपयाचा भाव मिळतो तेव्हा त्याचे प्रचंड नुकसान होते. ही संतापजनक बाब आहे.
- राजेंद्र डवरी, शेतकरी.
------------------------------------------------------------------
""शेतकऱ्याला दीड रुपया इतका कमी भाव मिळू नये ही अपेक्षा रास्तच आहे; पण चांगल्या कांद्याला इतर बाजारपेठांच्या तुलनेत एक-दोन ते अडीच रुपये असा चांगला भाव येथील बाजारपेठेत मिळाला आहे. कांद्याची प्रत कमी दर्जाची असेल तर त्याला भाव कमी मिळतो. काल एकूण झालेल्या सौद्यात चांगल्या दर्जाचा भाव 10 ते 12 रुपये किलोचा होता. ज्या शेतकऱ्यांचा कांदा चांगला होता त्यांना तो भावही मिळाला आहे. आवक वाढलेली आहे; पण पुढे मागणी नाही. तरीही येथे सौदे सुरळीत सुरू आहेत.''
-मोहन सालपे, उपसचिव, बाजार समिती, कोल्हापूर.
------------------------------------------------------------------
आता कांदा न्यावा कोठे?
राज्यातील इतर कांदा बाजारपेठांच्या तुलनेत कोल्हापूरच्या बाजारपेठेत कांद्याला भाव चांगला मिळतो, असा पूर्वानुभव असल्याने पुणे, नाशिक बाजार समिती जवळ असूनही अनेक शेतकरी विश्‍वासाने येथे कांदा आणतात. त्यामुळे व येथील कांदा बाजारपेठेत लाखो रुपयांची नियमित उलाढाल होते. त्याचा बाजारपेठेत कांद्याला दीड रुपया भाव असल्याने आता कांदा न्यावा कोठे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.
------------------------------------------------------------------

Web Title: Onion prices fell by half again