सोलापुरात व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची लूट

- सुदर्शन सुतार
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सोलापूर - शेतमालाची अडत शेतकऱ्यांऐवजी ती खरेदीदारांकडून घेण्याचे बंधन कायद्याने असतानाही सोलापुरातील कांदा व्यापारी मात्र खरेदीदारांकडून अडत घेताना व शेतकऱ्यांकडूनही उचल या नावाखाली सर्रास दोन टक्‍क्‍यांपर्यंतची रक्कम वसूल करत आहेत. हा सगळा प्रकार प्रशासक कुंदन भोळे यांच्या निदर्शनाला आणल्यानंतर त्यांनी चौकशी पथक नेमण्यासह अतिरिक्त वसुली थांबवण्याबाबत परिपत्रक काढले आहे. तसेच परवाने निलंबित करण्याचा इशाराही व्यापाऱ्यांना दिला आहे.

सोलापूर बाजार समितीच्या आवारात रोज 500 ते 600 गाड्यांपर्यंत कांद्याची आवक होते. सध्या कांद्याचा हंगाम सुरू आहे. कांद्याची रोज शेकडो गाड्यांची आवक होत आहे; पण भाव पडलेले आहेत. बाजार समितीत कांद्याचे सुमारे 200 हून अधिक व्यापारी आहेत. रोजची उलाढाल पाच ते सात कोटींच्या घरात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अडत बंद झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; पण व्यापाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

सरासरी "दोन टक्‍क्‍यां'ची वसुलीपट्टीवरून केली जाते आहे. त्यातून हजारो रुपये व्यापाऱ्यांच्या खिशात जात आहेत. काही व्यापारी "आम्ही रोख पैसे, चेकचे पारदर्शी व्यवहार करतो; पण नोटाबंदीमुळे अडचण आहे, सध्या परवडत नाही, असे सांगत शेतकऱ्यांना दोन टक्के वसुलीची गळ घालत आहेत. ऐनवेळी शेतकऱ्यांना हा पर्याय स्वीकारल्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांची कोंडी केली जाते आहे.

प्रशासकांनी नेमले तिघांचे चौकशी पथक
अडतीऐवजी उचलीच्या नावाखाली कांदा व्यापारी शेतकऱ्यांकडून सरसकट दोन टक्के रक्कम वसूल करून शेतकऱ्यांची लूट करत असल्याबाबत प्रशासक कुंदन भोळे यांच्या निदर्शनास आणले असता, याच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक नेमण्याचे, तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच यापुढे हमाली, तोलाई याशिवाय अन्य कोणतेही शुल्क व्यापाऱ्यांनी आकारू नये; अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ताकीद देणारे परिपत्रकही काढले आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी आपल्याकडे थेट लेखी अथवा तोंडी तक्रार द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: onion producer loot by traders