पदरमोड करून विकला कांदा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सोलापूर - यंदा दुष्काळी स्थिती असतानाही कांद्याला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ नोव्हेंबरला एका शेतकऱ्याने ५३ पोती कांदा विकला. त्याचे वजन दोन हजार ४०५ किलो झाले. एवढ्या वजनाचा कांदा विकूनही त्या शेतकऱ्यांला संबंधित अडत्याला पदरचे ३४३ रुपये द्यावे लागले. यावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती काय झाली याचा प्रत्यय येतो.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याच्या उलाढालीमध्ये राज्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये गणली जाते. याठिकाणी कर्नाटक राज्यातूनही कांद्याची मोठी आवक होते. मात्र, यंदा कांद्याला म्हणावा तसा भाव नाही. मागील महिन्यात कांद्याचा भाव जवळपास अडीच हजाराच्या आसपास गेला होता. मात्र, पुन्हा कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. कांद्याला भाव नसल्याने सरकारविरोधी वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारवर मोठा रोष निर्माण झाला आहे. 

कांद्याचे उत्पादन घेऊनही जर शेतकऱ्यांनाच पदरचे पैसे अडत्यांना द्यावे लागत असतील, तर याला म्हणायचे तरी काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही जर निघत नसेल, तर शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? उपलब्ध पाण्यावर कांद्याची लागवड केली. कांदा बाजारात नेला; पण त्याच कांद्याने शेतकऱ्याचा घात केल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

केंद्राने ठोस पावले उचलण्याची गरज
कांद्याचे भाव दिवसेंदिवस कोसळत चालले आहेत. त्याचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. दुष्काळी स्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Web Title: Onion Sailing in Loss