भारतात इजिप्तवरून येणार कांदा 

तात्या लांडगे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

एक लाख टन क्‍विंटल कांद्यासाठी निविदा काढली असून, काही दिवसांत कांदा देशात आणला जाणार असल्याची माहिती राज्याच्या पणन विभागातील सूत्रांनी सांगितली.

सोलापूर - देशातील अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादनात घट झाली आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आता इजिप्तहून कांदा आयात करण्याचे नियोजन केले आहे. एक लाख टन क्‍विंटल कांद्यासाठी निविदा काढली असून, काही दिवसांत कांदा देशात आणला जाणार असल्याची माहिती राज्याच्या पणन विभागातील सूत्रांनी सांगितली.

पाकिस्तानावरून कांदा येणार असल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे तुर्कस्तान अथवा इजिप्तहून कांदा आयात करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यात आता इजिप्तला पसंती देण्यात आली आहे. गरज पडल्यास आणखी कांदा आयात करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगिले. 

देशात अतिवृष्टीमुळे तब्बल 54 लाखांहून अधिक हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम कांदा लागवड आणि उत्पादनावर झाला. कोण-कोणत्या राज्यात कांद्याची लागवड किती झाली आणि अपेक्षित उत्पादन किती होईल, याची माहिती मंत्रालयातून मागविण्यात आली आहे. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील कांदा उत्पादनात घट झाल्याने कांदा आयात केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. महाराष्ट्रात कांद्याचा दर क्‍विंटलमागे आठ हजारांवर पोचला असून, दिल्लीसह अन्य राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे. 

देशातील कांदा टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्याचे नियोजन केले आहे. मंत्रालयातून देशातील कांदा लागवड व अपेक्षित उत्पादनाची माहिती तातडीने मागविली आहे. कृषी विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. 
- सुहास काळे, फलोत्पादन विकास अधिकारी, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion will come from Egypt in India