ऑनलाईन बॅंकिंग करताय... दक्षता घ्याच!

Online-Banking
Online-Banking

सांगली - कॉसमॉस बॅंकेवर डिजिटल दरोडा पडल्यानंतर बहुतांश ऑनलाईन व्यवहार करणारे ग्राहक धास्तावले आहेत. एटीएम, ऑनलाईन बॅंकिंग, ऑनलाईन खरेदी करतानाही धास्ती जाणवते आहे. अशा वेळी काही महत्त्वाची काळजी ग्राहकांनी घेतलीच पाहिजे. बाकी गोष्टींत बॅंकेची जबाबदारी मोठी असते. आपल्या बॅंकिंगशी निगडित सर्व माहिती गुप्त ठेवणे, हा त्याचा पहिला व सर्वांत महत्त्वाचा भाग. याविषयी तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहेत. त्याची अंमलबजावणी केली, तर आधुनिक बॅंकिंग सुरक्षित होऊ शकेल. 

बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंका, नागरी बॅंका, व्यापारी बॅंका आणि अनेक सहकारी बॅंकांचे स्वतःचे एटीएम आहेत. ग्राहक त्या बॅंकेतील खात्यांचा वापर करून ऑनलाईन बॅंकिंग करत आहेत. छोट्या पतसंस्थांसह अन्य सहकारी संस्थांत या सोयी अल्पप्रमाणात उपलब्ध आहेत. हे करताना बॅंकेचे ग्राहक म्हणून आणि बाजारपेठेत खरेदी करणारे ग्राहक म्हणून दोन्ही पातळ्यांवर शंभर टक्के दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

माशांसाठी गळ
ऑनलाईन बॅंकिंग फसवणूक करणारे माशांसाठी जाळे टाकावे, अशा पद्धतीचा वापर करतात. आमिष दाखवणारे ई-मेल आपल्याला पाठवले जातात. त्यात कैक प्रकारची, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकल्याचे सांगितले जाते. त्याला बळी पडलात, की आपल्या फसवणुकीचे सत्र सुरू होते. 

महत्त्वाच्या सूचना
 ‘एटीएम’चा पासवर्ड गुप्त ठेवा
 पासवर्ड महिन्यातून बदलाच
 कंपनी, बॅंकेच्या नावे फोनवरून माहिती मागितल्यास देऊ नका
 ऑनलाईन व्यवहारासाठी अज्ञात सायबर कॅफे वापरू नका
 घरातून बॅंकिंग करत असाल, तरीही सतत पासवर्ड बदलत राहा
 असुरक्षित ऑनलाईन कंपन्यांकडून खरेदी करू नका

ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून अलीकडे आपली माहिती काढून घेण्याचे प्रकार काही कंपन्यांकडून वाढले आहेत. अशा कंपन्यांशी व्यवहार टाळावेत. ‘कोट्यवधीचे बक्षीस लागलेय, इथे भेट द्या,’ असा संदेश आला, की तो डिलीट करावा. बॅंकेकडे आपले एसएमएस अलर्ट सुरू करून घ्यावे, शंकास्पद व्यवहार झाल्यास तत्काळ बॅंकेला कळवावे.
- आर. एस. पुजारी, निवृत्त व्यवस्थापक, लीड बॅंक

छोट्या बॅंकांकडे सुरक्षा व्यवस्था फार कमजोर आहेत. त्यासाठी खर्च मोठा असला तरी ती गरजेची आहे. सायबर सुरक्षेला विमा कवच असते. ते बॅंकांनी स्वीकारले पाहिजे. त्याच्या ‘थर्ड पार्टी ऑडिट’ची सक्ती झाली पाहिजे. ऑनलाईन बॅंकिंगचा आग्रह करत असताना या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आधुनिक तंत्रांसाठी संशोधन करून ते वापरले पाहिजे.
- प्रवीण नाईक, व्यवस्थापकीय संचालक, वितराग कॉम्प्युटर्स

कॉसमॉस बॅंकेवर झालेला प्रकार हा बॅंकेने खबरदारी न घेतल्याने झाला. नागरिकांनी मात्र ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे. नेट बॅंकिंग करणाऱ्या खात्यात पैसे कमी ठेवा. काम झाल्यानंतर ते अकार्यरत करा. हीच पद्धत मोबाईल बॅंकिंगमध्येही वापरा. कोणतेही भरमसाट ॲप्स डाऊनलोड करू नका. मेल, वेबसाईटवर प्रतिक्रिया देऊ नका.
- संजीव कुलकर्णी, संचालक, लिस्ट सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, सांगली

एटीएम क्रमांक, पासवर्ड गुप्त ठेवा. पेट्रोल पंपासह अन्यत्र पैसे देताना स्वतः स्वाईप करा. ‘पासवर्डची मुदत संपलीय, जुना पासवर्ड सांगा,’ असा कोणत्याही बॅंकेचा फोन येत नाही. त्यांना पासवर्ड देऊ नका. बॅंकेत कागदपत्रांची पूर्तता करताना ‘केवळ बॅंकेच्या कामकाजासाठी’ असा उल्लेख करा. ऑनलाईन व्यवहार करताना एटीएम क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक गुप्तच ठेवा. काही परदेशी ‘ओटीपी’द्वारे गोलमाल करतात. 
- शशिकांत बोराटे, अपर अधीक्षक, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com