ऑनलाइन ‘७-१२’ला ऑगस्ट उजाडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

शासनाकडून कालबद्ध कार्यक्रम; सध्या ९५ टक्‍क्‍यांच्या पुढे संगणकीकरण पूर्ण

कऱ्हाड - शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बहुचर्चित ऑनलाइन सात-बारा उताऱ्यांची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार आहे. ऑनलाइन उताऱ्यातील त्रुटी आणि काही ठिकाणचे उतारे ऑनलाइन न झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित काम हे किचकट असल्याने ऑनलाइन सात-बाराचे काम पूर्ण होण्याची मुदत सातत्याने पुढे- पुढे ढकलत नेण्यात आली. हे काम आता ऑगस्ट महिन्याच्याही पुढे जाऊ नये, यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. 

सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचे काम हे आघाडी शासनाच्या काळापासून सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची त्यावेळेपासूनच प्रतीक्षा आहे. प्रत्येक गावच्या उताऱ्यांचे संगणकीकरण करावयाचे असल्याने ते काम किचकट होते. त्यामुळे त्याला तलाठी संघटनेने विरोध केला. त्याचबरोबर त्यांना जे नेट कनेक्‍टर दिले होते, त्यालाही ग्रामीण भागात ‘रेंज’ येत नसल्याने त्याचाही मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे संबंधित काम रेंगाळत चालले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन उतारे मिळत नसल्याने जागेचे खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जप्रकरणे करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासाठी मध्यंतरी आंदोलनेही झाली. मात्र, तरीही प्रशासनाने ऑनलाइन प्रक्रियेवर जोर देवून संबंधित काम पूर्ण होण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदारांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फळ म्हणून की काय, संबंधित काम सध्या ९० ते ९५ टक्‍क्‍यांच्या पुढे गेलेले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल. त्याचीही कार्यवाही वेगाने सुरू आहे. मात्र, जे उतारे ऑनलाइन प्रक्रियेत आले आहेत आणि त्यात ज्यांना आपल्या उताऱ्यात चुकीची नोंद झाली आहे असे वाटते आहे, त्यांनी १५ मेपर्यंत त्यावर हरकत घेवून तशी माहिती तलाठ्यांना अर्जाव्दारे द्यायची आहे. त्यानंतर संबंधित तयार झालेल्या ऑनलाइन उताऱ्याचे प्रत्येक गावात चावडी वाचन केले जाईल. त्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, त्याची माहिती प्राप्त झाल्यावर संबंधित तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडून मूळ उतारा आणि संगणकीकृत उतारा याची पडताळणी करून तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये ३१ जुलैपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी मुदतीमध्ये अर्ज दाखल होणे आवश्‍यक आहे. त्यानंतर एक ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरीत संगणकीकृत सात-बारा उपलब्ध होईल.

...असा आहे कार्यक्रम 
१ ते १५ मे - संगणकीकृत सात-बाऱ्यात त्रुटी असल्यास हरकत घेणे  
१५ मे ते १५ जून-ऑनलाइन उताऱ्याचे चावडी वाचन करणे
१६ जून ते ३१ जुलै-आवश्‍यकता असल्यास सात-बाऱ्यात दुरुस्त्या 
१ ऑगस्ट २०१७-डिजिटल स्वाक्षरीत संगणकीकृत सात-बारा उपलब्ध होईल

Web Title: online 7/12 in august