प्रिंटरचा नाही पत्ता, म्हणे ऑनलाईन उतारा द्या!

लुमाकांत नलवडे 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

बसायला जागा नाही अन्‌ ऑनलाईनची चर्चा...
राज्यात २०१६ पासून ऑनलाईन सातबारा उतारा उपक्रम सुरू झाला. यासाठी लॅपटॉप, प्रिंटर, ऑपरेटर ही यंत्रणा तलाठ्यांनी उभी केली.

कोल्हापूर - वरिष्ठांच्या व्हॉटस्‌ ॲप मेसेजला कंटाळून राज्यातील १२ हजार तलाठी आणि दोन हजार सर्कल कार्यालयीन अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉटस्‌ ॲप’ ग्रुपमधून ‘लेफ्ट’ झाले आहेत. ऑनलाईन सातबारा उतारा देण्यासाठी प्रिंटर द्यायचे नाहीत, आणि प्रिंट द्या, म्हणून सांगायचे. आम्ही कोठून प्रिंट देणार? सुविधा देत नाहीत आणि आदेश देण्यात अधिकारी पुढे आहेत. त्यामुळेच निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापनाव्यतिरिक्त अधिक काम करणार नसल्याचा निर्णय घेऊन राज्यातील तलाठी-सर्कल संघटनेने बंडाचा झेंडा फडकवला आहे.

सायंकाळी सहा वाजता मेसेज द्यायचा आणि माहिती ताबडतोब द्या, म्हणून सांगायचे. सकाळी दहा वाजता मेसेज करायचा आणि आत्ताच्या आत्ता माहिती द्या, म्हणून सांगायचे. दुपारी दोन वाजता मेसेज द्यायचा आणि चार वाजता बैठक असल्याचे सांगायचे. असे वरिष्ठांचे मेसेज व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर येत होते. त्यातून मनःस्ताप सहन करावा लागत होता. याचबरोबर अन्य मागण्याही मान्य होत नसल्यामुळे राज्याच्या महसूल विभागातील तलाठी आणि सर्कल (मंडल अधिकारी) यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. कार्यालयीन व्हॉटस्‌ ॲप ग्रुपमधून लेफ्ट होऊन त्यांनी एक पाऊल उचलले आहे. 

महसूलमध्ये लोकांत मिसळणे, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि वेगवेगळ्या योजना जनतेपर्यंत पोचविणे, अशी अनेक कामे हा वर्ग करतो. मात्र, त्यांना आवश्‍यक सुविधा देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे.

बसायला जागा नाही अन्‌ ऑनलाईनची चर्चा...
राज्यात २०१६ पासून ऑनलाईन सातबारा उतारा उपक्रम सुरू झाला. यासाठी लॅपटॉप, प्रिंटर, ऑपरेटर ही यंत्रणा तलाठ्यांनी उभी केली. त्याचा खर्च काही ठिकाणी मिळालेला नाही. आता प्रिंटर नाहीत. स्वतः तलाठ्यांनी घेतलेले लॅपटॉप जुने झाले आहेत. तरीही प्रिंट जागीच द्यावी, असे आदेश आहेत. प्रिंट कोठून द्यायची? अनेक ठिकाणी सज्जासाठी इमारती नाहीत. त्यामुळे बसायला जागा नाही आणि ऑनलाईनची चर्चा सुरू असल्याचे जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष धनाजी कलिकते यांनी  सांगितले. 

राज्यात नव्याने ३१६५ सज्जे झाले आहेत; मात्र त्यासाठी भरती झाली नाही. राज्यात १२ हजार ६३६ तलाठी, १२०६ सर्कल आहेत. ऑनलाईन उताऱ्यासाठी केलेला खर्च मिळत नाही. अतिरिक्त कामाचा मोबदलाही देत नाहीत. म्हणून आपत्कालीन आणि निवडणूक कामाव्यतिरिक्त जादा काम करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
- ज्ञानेश्‍वर ऊर्फ आप्पा डुबल,  अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी-सर्कल संघटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online 7/12 issue Talathi organizations will revolt in kolhapur