सातबारातील चूक पडतेय महागात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

सातारा - सातबारा ऑनलाइन करण्याचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. पण, ज्या तालुक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. या ऑनलाइन सातबाऱ्यामध्ये काही चूक राहिली असल्यास ती दुरुस्तीसाठी कोणतीही फी नाही. मात्र, या दुरुस्तीसाठी सध्या दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी सातारा तहसील कार्यालयातच साखळी कार्यरत आहे.

सातारा - सातबारा ऑनलाइन करण्याचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. पण, ज्या तालुक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. या ऑनलाइन सातबाऱ्यामध्ये काही चूक राहिली असल्यास ती दुरुस्तीसाठी कोणतीही फी नाही. मात्र, या दुरुस्तीसाठी सध्या दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी सातारा तहसील कार्यालयातच साखळी कार्यरत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ऑनलाइन सातबाऱ्याची मोहीम जोरदारपणे राबविली. जिल्ह्यात आता ऑनलाइन सातबारे उपलब्ध होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही तालुक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. हस्तलिखित सातबाऱ्यावरील नावे व इतर माहिती ऑनलाइन सातबाऱ्यात आलेली नसल्यास ही चूक दुरुस्तीसाठी कोणतीही फी आकारली जात नाही. केवळ एक अर्ज संबंधित तलाठ्याकडे द्यायचा आहे. त्यावर तलाठी मंडलाधिकाऱ्याला रिपोर्ट करतात. मंडलाधिकारी त्याची माहिती तहसीलदारांकडे पाठवितात व त्याच दिवशी सातबाऱ्यातील चुकीची दुरुस्ती तहसीलदार करतात. मात्र, सातारा तहसील कार्यालयात याबाबत नेमकी उलटीच प्रक्रिया सध्या सुरू आहे. हस्तलिखित सातबाऱ्यावरील एखादे नाव ऑनलाइनच्या सातबाऱ्यावर आलेले नसेल तर ही दुरुस्ती करण्यासाठी संबंधित व्यक्तीला दोन ते पाच हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले जात आहे. ही ‘बिदागी’ मिळाल्याशिवाय दुरुस्तीही होत नाही. या प्रक्रियेत काही तलाठीही सहभागी असल्याची चर्चा आहे. 

ऑनलाइनच्या माध्यमातून भाजप सरकारने पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. तो चांगला असला तरी त्यातील त्रुटींचा फायदा घेण्यापर्यंत महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मजल गेली आहे. त्यामुळे त्यावर वचक कसा बसणार, असा प्रश्‍न सामान्यांतून व्यक्त होत आहे. सातबारा ऑनलाइन होत असताना ही सर्व माहिती तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडलाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होते. तरीही माननिर्मित चूक राहात असल्यास ती दुरुस्तीसाठी थेट तहसीलदारांनाच अर्ज करण्याची पद्धत सुरू करणे गरजेचे आहे. 

लाचखोरांचे धाडस वाढतेय?
मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच एका तलाठ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या कारवाईनंतरही आजही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लाच स्वीकारण्याचे प्रकार होत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. सातबाऱ्यावरील चुकीची दुरुस्तीसाठी संबंधित व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बोलावून पैसे घेतले जाते. त्यामुळे ऑनलाइन सातबाऱ्यावरील चूक खातेदारांना महागात पडत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online satbara issue