श्रीगोंद्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या ऑनलाईन सेवेचा फज्जा 

श्रीगोंद्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या ऑनलाईन सेवेचा फज्जा 

श्रीगोंदे (नगर) : राज्य निवडणूक आयोगाने श्रीगोंदे नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याचा फतवा काढला मात्र त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. या आदेशानुसार उमेदवारांना निवडणूक लढविताना उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटवर भरणे बंधनकारक केले आहे. मात्र ऑनलाईन यंत्रणाच दोन दिवसांपासून ठप्प आहे. गेल्या सहा दिवसात केवळ सहाच अर्ज दाखल झाल्याने ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मागणी होत आहे. 

नगरपालिका, नगरपंचायत, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व त्याअंतर्गत केलेले निवडणूक नियम पाहता उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑनलाइन सादर करावा याबाबत कुठेही तरतूद आढळून नसली तरी निवडणूक आयोगाने काढलेल्या फतव्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता उपलब्ध करून दिलेली वेबसाईट सायबर हल्ल्यापासून सुरक्षित नसल्याचे दिसून येते. 

तसेच या संकेतस्थळावर अर्ज भरताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करणे अतिशय जिकिरीचे आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याकरिता सायबर कॅफेमध्ये जाऊन इतर लोकांची मदत घ्यावी लागत आहे. त्यातही वेबसाईटवर अनेकदा माहिती भरूनही ती अपडेट होत नसल्याने इच्छूक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत

महाराष्ट्र नगरपालिका कायद्याच्या कलम १७(१) घ नुसार उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याबाबत विधिमंडळाने नियम करणे आवश्यक आहे. तसे नियम केले नसताना ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह धरणे हे अतिशय चुकीचे असून मूळ तरतुदींच्या उद्देशाच्या विरुद्ध आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे हे अतिशय खर्चिक , वेळ खाऊ काम असून बेकायदेशीर आहे. 

श्रीगोंदे नगरपालिकेत पन्नास टक्के जागा महिलांकरिता राखीव असून त्यातील बहुतेक जागांवर गृहिणी उमेदवारी भरणार आहेत. तसेच अंध, अपंग, अशिक्षित (सदर प्रणाली इंग्रजी भाषेत आहे), मागास घटकांना निवडणूक प्रक्रिया समजून घेतानाच वेळ लागत असून त्यात पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याचा हट्ट धरल्यास त्यांना आपल्या मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे दिसते.  

त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ही ऑनलाईन यंत्रणाच ठप्प असल्याने एकही अर्ज दाखल होवू शकलेला नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत बुधवारी असून दोन दिवसात सगळे अर्ज कसे दाखल होणार यावरुन पेच झाला आहे. माजीमंत्री बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. तुकारम दरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संजय आनंदकर, काँग्रेसचे राजेश डांगे यांनी थेट आयोगाला पत्र लिहिले, दुरध्वनीवरुन चर्चा केली मात्र त्यात तोडगा निघत नसल्याने सगळेच त्रस्त आहेत. 

ऑनलाईन गोंधळाबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला आलेल्या तक्रारी मेल केल्या आहेत. ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारण्याबाबत अजून तरी कुठलाही आदेश आलेला नाही. 
- गोविंद दाणेज, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com