Loksabha 2019 : कोल्हापूर - दुर्गम चिक्केवाडीत अवघे ३२ मतदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

एक नजर

  • चिक्केवाडी रांगणा किल्ल्यापासून दोन किलोमीटरचे गाव. 
  • फक्‍त आठ घरे आणि ३२ मतदार.
  • घनदाट जंगल, खाचखळग्याचा रस्ता
  • चिक्केवाडीसाठी एक किलोमीटर पायी प्रवास
  •  तात्पुरता छोटा मंडप उभारून मतदान केंद्र केले उभे. 

कोल्हापूर - जिल्ह्याचे भुदरगड तालुक्‍यातील शेवटचे टोक असलेल्या व फक्त ३२ मतदार असलेल्या चिक्केवाडी या गावात सोमवारी दुपारी कर्मचारी पोहोचले. त्यांनी तात्पुरता छोटा मंडप उभारून मतदान केंद्र उभे केले.

चिक्केवाडी रांगणा किल्ल्यापासून दोन किलोमीटरचे गाव आहे. फक्‍त आठ घरे आणि ३२ मतदार, अशी त्याची ओळख आहे.  पाटगावनंतर  घनदाट जंगल, खाचखळग्याचा रस्ता असा प्रवास व पुढे एक किलोमीटर पायी प्रवास करूनच या चिक्केवाडीत पोहोचता येते. चिक्केवाडीतून रांगण्याला गेले, की कोल्हापूर जिल्ह्याची हद्द संपते.व पुढे दरी उतरली की कोकणच लागते. 

या गावात यापूर्वी वीज नव्हती. मध्यंतरी सौरऊर्जेवरची वीज आली व दीड वर्षापूर्वी दीनदयाळ योजनेतून कायमस्वरूपी वीजपुरवठा झाला. गावात आठच घरे आहेत. बहुतेक तरुण मुले कोल्हापुरात किंवा मुंबईत हॉटेलात कामास आहेत.

गावासभोवती जंगल असल्याने गव्यांचा नित्य वावर परिसरात आहे. याशिवाय बिबट्यांचाही वावर आहे. गाव जवळच्या पाटगाव गावापासून २२ किलोमीटर लांब आहे. त्यामुळे एवढ्या अंतरावर लोक मतदानासाठी येणे शक्‍य नसल्याने गेल्या १५ वर्षांपासून या गावातच मतदान केंद्र सुरू केले. गेल्या निवडणुकीत २१ मतदार होते. या वेळेस ते ३२ झाले. 
आज एस. एल. शिणगारे, श्री. खाडे, महेश चौगुले, सी. एन. जोशी, रमेश कोरवी, पाथरवट, चंद्रकांत हानफोडे, पोलिस आर. एल. नकुलवार क्रुझरमधून सर्व साहित्य घेऊन तेथे पोहचले. तलाठी एकनाथ मिसाळ यांनी जेथे रस्ता संपतो, तेथून सर्व साहित्य घेऊन ते गावात पोहोचले.
 

Web Title: only 32 voting in Chikkewadi in Kolhapur