राज्यात केवळ 56 कारखान्यांची धुराडी पेटली

प्रदीप बोरावके
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

0 50 टक्के देखील कारखाने अद्याप सुरू नाहीत 
0 एक डिसेंबरपर्यंत राज्यात 13.56 लाख टन गाळप 
0 दुष्काळ अन्‌ परतीच्या पावसामुळे उसाचे मोठे नुकसान 
0 अपुऱ्या उसामुळे यंदाचा हंगाम कारखान्यांसाठी खडतर

माळीनगर (जि. सोलापूर) : उन्हाळ्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर राज्यात झालेल्या परतीच्या अतिपावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपुरा ऊस व ऊस तोडणी यंत्रणेची कमतरता यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसाठी यंदाचा गाळप हंगाम खडतर ठरत आहे. यंदा एक डिसेंबरअखेर राज्यात केवळ 56 कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. गाळप परवाने मिळालेल्या कारखान्यांपैकी 50 टक्के देखील कारखाने अद्याप सुरू झाले नाहीत. 

हेही वाचा : जाणून घ्या, सोलापुरात का येतोय सर्वाधिक कांदा 

उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊसतोड झाली. उन्हाळ्यात जळू लागलेला ऊस छावणीस देणे शेतकऱ्यांनी पसंत केले. गतवर्षी कारखाने बंद झाले तरी चारा छावण्यांमुळे उन्हाळ्यात गाळप हंगाम सदृश्‍य स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली या ऊस पट्ट्यांच्या जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झाल्याने तेथील उसशेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यंदाचा हंगाम साखर उद्योगासाठी जाचक ठरणार, हे स्पष्ट झाले होते. ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका राज्यात झाल्या. त्यानंतर सत्तास्थापनेच्या नाट्यामुळे राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट झाली. त्यामुळे गाळप हंगाम सुरू करण्यासाठी राज्यपालांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व अधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत 22 नोव्हेंबरपासून गाळपास परवानगी देण्यात आली. 

हेही वाचा : प्रतापगडावरील त्या क्षणाची मी साक्षीदार : शालिनीताई पाटील 

राज्यात सध्या 29 सहकारी व 27 सहकारी मिळून 56 कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. एक डिसेंबरपर्यंत राज्यात 13.56 लाख टन उसाचे गाळप होऊन 10.13 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.47 टक्के आहे. यंदाच्या हंगामात अपुऱ्या 
उसाबरोबरच उसतोडणी यंत्रणेच्या अभावाचा कारखान्यांना सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. परिणामी पूर्ण क्षमतेने कारखाने चालण्यात अडचणी येत आहेत. सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा अशी सोलापूरची राज्यात ओळख आहे. यंदा 29 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात फक्त आठ कारखाने सुरू झाले आहेत. सहकार महर्षी, सासवड माळी, विठ्ठलराव शिंदे, जकाराया, पांडुरंग, युटोपीयन, विठ्ठल शुगर्स म्हैसगाव, जयहिंद आचेगाव या कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. 

130 कारखान्यांना गाळप परवाने
राज्यात 130 साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी 56 कारखान्यांनी आतापर्यंत गाळप सुरू केले आहे. 
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 56 sugar factories started in the maharashtra