सोलापूर दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीत फक्त 62 संस्था 

logo
logo

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज तालुका सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या यादीत फक्त 62 संस्थांचा समावेश असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस वगळता 11 पैकी 10 तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या दूध संघाच्या निवडणूकीसाठी प्रारूप यादीत फक्त 62 संस्थांचा समावेश झाला आहे. 
हेही वाचा : सावधान! स्वस्तातील मोटारसायकल घेताय 
भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक हे सध्या जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष असून 2021-21 ते 2025-26 या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडण्या करिता निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात दररोज साडेबारा लाख लिटर दुधाचे संकलन होते. सोलापूरच्या दुध व्यवसायात खासगी दूध संघांचा मोठा शिरकाव झाला आहे. लेखापरीक्षण, सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणे, सहकारी संस्थेत शासनाचा वारंवार होणारा हस्तक्षेप यामुळे प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अनेक सहकारी दूध संस्था सोलापूर जिल्हा दूध संघासोबत संलग्न आहेत परंतु दुध मात्र खासगी दूध संघाला घालत आहेत. 
हेही वाचा : का आहे परदेशी पाहुण्यांना सोलापूरचे आकर्षण 
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेमध्ये सोलापूर जिल्हा दूध संघाची प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि अर्थकारणात जिल्हा दूध संघाचा वाटा मोठा राहिला आहे. दूध संघाचे एकूण 17 संचालक असून सर्वसाधारण मतदार संघातून 12, ओबीसी मतदार संघातून एक, महिला मतदार संघातून दोन, अनुसुचित जाती व जमाती मतदार संघातून एक आणि भटक्‍या जाती व जमातीमधून एक संचालक निवडण्यात येणार आहे. 
अवसायनातील संस्थांकडे लक्ष 
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या जवळपास दोन ते अडीच हजार संस्था सभासद आहेत. सभासद असलेल्या संस्थांपैकी 656 संस्था या अवसायनात घेतल्या आहेत. अवसायानातील संस्थांना मतदानाचा हक्क मिळणार का? याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास क्रियाशिल आणि अक्रियाशिल सभासदत्व हा निकष लावून अंतीम मतदार यादी तयार केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com