शिकाऊ डॉक्‍टरांवरच "ओपीडी'चा भार 

प्रवीण जाधव
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

कायाकल्प योजनेत राज्यात पहिला क्रमांक मिळविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची अवस्था दयनीय होत चालली आहे. जिल्ह्यातील सामान्य रुग्णांच्या आरोग्याची संजीवनी असलेल्या या रुग्णालयातील कामाचा व सुविधांचा दर्जा सुधारणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी रुग्णालयातील समस्यांचा वेध घेणारी लेखमाला आजपासून... 

सातारा - बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. सकाळ आणि सायंकाळ दोन्ही वेळेला होणाऱ्या ओपीडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काटेकोर नियंत्रण राहिले तरच, या विभागात सामान्य रुग्णांना चांगल्या सुविधा मिळू शकतात. 

दररोज एक हजारांहून जास्त लोक जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध भागांतून येणाऱ्या रुग्णांचा समावेश असतो. पूर्वी केवळ सकाळच्या कालावधीतच बाह्यरुग्ण विभाग सुरू होता. लांबून येणाऱ्या रुग्णांना तसेच सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन सायंकाळी चार ते सहा या वेळेतही बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय आघाडी शासनाने घेतला. डॉ. सुरेश जगदाळे हे जिल्हा शल्यचिकित्सक असताना हा निर्णय झाला होता. त्यांच्या कार्यकाळात काही अपवाद वगळता हा विभाग दोन्ही वेळेला व्यवस्थित सुरू होता. या विभागाच्या कार्यपद्धतीतही त्यांनी सुधारणा केल्या होत्या. मात्र, त्यांच्या बदलीनंतर या विभागात विस्कळितपणा आला. तो संपूर्ण कार्यकाळात डॉ. श्रीकांत भोई यांना व्यवस्थित करता आला नाही. 

बहुतांश बाह्यरुग्ण विभागात फार थोडावेळ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पाहायला मिळतात. उशिरा यायचे, थोडा वेळ थांबायचे आणि बाहेरचा रस्ता धरायचा, असा अनेकांचा शिरस्ता. बहुतांश वेळा शिकाऊ डॉक्‍टरांवर बाह्यरुग्ण विभागाचा भार पडलेला दिसतो. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे योग्य निदान होईल की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ठरलेली औषधे चिठ्ठीवर टाकायची की बोलव दुसरा, असा प्रकार सुरू असतो. काही तपासण्या करायला सांगितल्या तर औषधे मिळतील का असा प्रश्‍न. कारण तपासण्या करून येईपर्यंत वैद्यकीय अधिकारी जागेवर सापडेलच याची श्‍वाश्‍वती नसते. सायंकाळी तर, अनेक जण हजेरी पुरतेच येताना दिसतात. चारची ओपीडीची वेळ असताना काही महाशय पाच वाजता रुग्णालयाला पाय लावतात. सव्वापाच, साडेपाचला त्यांनी परतीचा मार्ग धरलेला असतो. त्यामुळे लांबून असलेल्या रुग्णांची निराशा होते. अनेकदा तर, सायंकाळी कशाला येता, सकाळी यायचे ना... असा सल्ला रुग्णाला दिला जातो. 

(क्रमशः) 

दैनंदिन नियोजनाचे काम कोणाचे? 
जिल्हा रुग्णालयाच्या दैनंदिन नियोजनाचे काम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाहायचे की जिल्हा शल्यचिकित्सकांनी, या वादातच अडीच वर्षे निघून गेली. वैद्यकीय अधिकारी ऐकत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा म्हटले तर, जिल्हा शल्यचिकित्सक ती करत नाहीत. ठोस भूमिका नसल्याने सर्वांचे फावते, असा युक्तिवाद अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक कायम करत राहिले. मात्र, या दोघांना बाह्यरुग्ण विभागात सुसूत्रता आणण्यात शेवटपर्यंत यश आले नाही.

Web Title: OPD load on the trainee doctor

टॅग्स