कर्नाटक निवडणूक ; शहर व ग्रामीण भाजप कार्यालयात स्वतंत्र जल्लोष

तात्या लांडगे
मंगळवार, 15 मे 2018

काँग्रेस पिळ्ळूश्री अन्‌ भाजप खेळ्ळूश्री 

काँग्रेस सरकारने जनतेची पिळवणूक केली असून जनतेच्या कल्याणापेक्षा स्वत:चेच कल्याण केले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या विकासासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले. त्यांच्या आवाहनाला कर्नाटक जनतेने साथ दिली. देशातील 22 राज्यात आता भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. 

- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 

सोलापूर : कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत भाजपने भरघोस यश संपादन केल्याने सोलापूर शहर व ग्रामीण भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. परंतु, दुपारी साडेबाराच्या सुमारास पालकमंत्र्यांसह अन्य कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर दुपारी साडेतीनच्या सुमाराला ग्रामीण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. 

कर्नाटक राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सकाळपासूनच अनेकजण टिव्हीकडे डोळे लावून बसले होते. निकालाला सुरवात झाल्यानंतर थोड्याच वेळात भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकले आणि बहुमताकडे आगेकूच सुरू केली. भाजपकडे काँग्रेसपेक्षा अधिक जागा आल्याचे स्पष्ट होताच पालकमंत्र्यांच्या कार्यालयातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर येत अरगजा, गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करु लागले.

भाजपचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा जयघोष केला. यावेळी महापालिका सभागृहनेते संजय कोळी, उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्यासह आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सिव्हिल चौकातील भाजप कार्यालयासमोर कर्नाटक निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष केला. 

यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, उत्तर सोलापूर भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, संभाजी भडकुंबे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आंनदोत्सव साजरा केला. 
 

काँग्रेसचे जातियवादी राजकारण जनतेने ओळखले आणि विकासाच्या मुद्द्यावर कर्नाटक जनतेने भाजपला साथ दिली. दक्षिणेत आता सर्वात मोठा पक्ष भाजप झाला असून, आगामी काळात देशातील सर्वच राज्यात भाजप सत्ता स्थापन करेल.  

- शहाजी पवार, भाजप जिल्हाध्यक्ष

Web Title: Open Celebration at city and rural BJP office