शिव्या देणारे विरोधकच माथा टेकवत आहेत : सुरेंद्र गुदगे

शिव्या देणारे विरोधकच माथा टेकवत आहेत : सुरेंद्र गुदगे

मायणी : खोट्या गुन्ह्यात अडकवून मला जीवाभावाच्या लोकांपासून सात महिने दूर ठेवले. गलिच्छ राजकारणाचा कळस केला. माजी आमदार भाऊसाहेब गुदगेंना सतत शिव्यांची लाखोली वाहण्यात ज्यांनी धन्यता मानली. तेच विरोधक राजकीय स्वार्थासाठी भाऊसाहेबांच्या चरणावर माथा टेकवू लागले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राज्य कायर्कारिणी सदस्य व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी विरोधकांचा बुरखा फाडला.

येथील केबलचालक मोहन जाधव यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगेंना सशर्त अटकपूर्व जामीन मिळाला होता. मायणी पोलिस दूरक्षेत्राच्या कार्यकक्षेत म्हणजेच गुदगें सदस्य असलेल्या जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये त्यांना नो एन्ट्रीची अट होती. तब्बल सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर आज सीमोल्लंघन करीत त्यांनी मायणीत एंट्री केली. फटाके फोडून, घोषणा देत लोकांनी त्यांचे स्वागत केले. प्रारंभीच भाऊसाहेब गुदगेंच्या समाधीचे दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसह फेरीने सर्वजण सिद्धनाथ मंदिरात एकत्र आले.

दरम्यान, भेटीसाठी आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी हारतुरे, पुष्पगुच्छ देत स्वागत केले. अनेकांनी हस्तांदोलनासह नेत्याला घट्ट मिठीही मारली. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यावेळी सुधाकर कुबेर, माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र सानप, भाऊसाहेब लादे, विनोद पंडीत, माजी सरपंच छाया सुरमुख, प्रतिभा माळी, सुनीता बागडे, दादासाहेब कचरे, आदींसह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सिद्धनाथ मंदिराच्या सभामंडपात झालेल्या सभेत बोलताना सुरेंद्र गुदगे म्हणाले, मला रोखण्यासाठी, विरोधक वाट्टेल ते करायला तयार आहेत. मात्र आपली संघटना अभेद्य आहे. संघटना व विकासकामांच्या माध्यमातुन विरोधकांना वारंवार धुळ चारली आहे. काहीच जमत नाही म्हणुन अखेर त्यांनी घरात फुट पाडल्याचे स्पष्ट करुन गुदगे म्हणाले, छोटा भाऊ त्यांच्या गळाला लागला.

भाऊसाहेबांनी ज्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला. त्याच प्रवृत्तीशी आई व भावाने संधान बांधले. मी मात्र मरते दम तक भाऊसाहेबांची तत्त्वांशी प्रतारणा करणार नाही. त्यासाठी कितीही अन् काहीही किंमत मोजायला लागो. सात महिन्यांच्या कालावाधीतील विकासकामांचा बॅकलाॅग भरुन काढण्यासह सर्वांच्या भेटीसाठी जिल्हा परिषद सदस्य आपल्या दारी हे अभियान राबवणार असल्याची घोषणाही गुदगेंनी केली. दादासाहेब कचरे यांनी प्रास्ताविक केले. हेमंत जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com