शब्दअक्षरांसंगे समृद्धतेची संधी

शब्दअक्षरांसंगे समृद्धतेची संधी

‘वाचाल तर वाचाल,’ ही उक्ती आपण अधूनमधून ऐकत असतो. वाचनाचे महत्त्व सातत्याने अधोरेखित केले जात असते. त्यामुळेच आपल्या आयुष्यात पुस्तकांचे महत्त्वही खूप मोठे ठरते. अत्याधुनिक युगात वाचनाची माध्यमेही बदलली आहेत. इंटरनेटद्वारे, छोट्या स्क्रिनवरून वाचणाऱ्यांची संख्याही वाढली आहे, तरीही पुस्तकांच्या वाचनाची अनुभूती वेगळीच असते. अलीकडील काळात सातारा शहरातील ग्रंथमहोत्सवाने वाचनसंस्कृतीला बळ दिले. ग्रंथमहोत्सव हा वाचनचळवळीचा पाया बनला आणि पुस्तकांच्या गावाच्या रूपाने भिलार या चळवळीचा कळस ठरण्याची शक्‍यता आहे. देशातील पहिले पुस्तकांचे गाव आपल्या जिल्ह्यात झाले. पुढील काळात ते आणखी विकसितही होईल. या उपक्रमाचा फायदा आपल्या जिल्ह्यातील लोकांनी अधिकाधिक घेतला पाहिजे, तरच हा उपक्रम आपल्या जिल्ह्यात आहे, याचा अभिमान बाळगता येईल.

महाबळेश्‍वर- पाचगणी या पर्यटनस्थळांचे महत्त्व आता आणखी वाढेल. निसर्गसंपदा आणि स्ट्रॉबेरीच्या गोडीबरोबर आता वाचनाची गोडी निर्माण करण्यात हा परिसर महत्त्वाची भूमिका बजविणार आहे. देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी झाले.

जगभरातील पर्यटकांना निसर्गाच्या संगतीने वाचनाचा आनंद घेण्याची संधी त्यामुळे उपलब्ध झाली आहे. ‘आम्हा घरी धन... शब्दांचीच रत्ने!’ हे बोधवाक्‍य घेऊन राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने हा उपक्रम सुरू झाला. सदाहरित जंगल, मनोवेधक दऱ्या, मनोहारी निसर्ग, लालसर माती, छोटेमोठे धबधबे असे निसर्गाचे विविध आविष्कार दाखविणाऱ्या या भूमीत पर्यटकांची मांदियाळीच असते. इथे येणारा पर्यटक या वाचनसंस्कृतीशी जोडला जावा, या हेतूने पुस्तकांचे गाव विकसित करण्यात आले. येणारे पर्यटक हा आनंद घेऊ शकतील. किमान सातारा जिल्ह्यातील लोकांनी तरी या उपक्रमाचा फायदा जाणीवपूर्वक घेतला पाहिजे. ‘पिकते तिथे विकत नाही’ ही म्हण खोटी करून दाखवायला हवी.

साक्षात पुस्तकांचा खजिना आपल्या पुढ्यात येऊन आपली वाट पाहतोय, अशी संधी आपल्यासमोर आहे. पुस्तकं आपलं जगणं समृद्ध करतात. आपल्या ज्ञान, विचाराला दिशा देतात. अशी मोठमोठी वाक्‍य आपल्याला कोणी ना कोणी सांगत असतं, तरीही पुस्तक वाचल्यानंतर मनाला मिळणारा आनंद हा काही औरच असतो. त्याच्या अनुभूतीचं वर्णन करता येत नाही. या आनंदाची किंमत करता येणार नाही, त्या आनंदाचे मोजमाप करता येणार नाही. प्रत्येकाला व्यक्तिगत पातळीवर त्या आनंदाची अनुभूती मिळत असते. तो आनंद मिळविण्याची संधी आपल्या दारात चालून आली आहे.

पाचगणीपासून पाच किलोमीटरवरील भिलार गाव. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध. आता झाले पुस्तकांचे गाव. या गावातील २५ घरे एकेका विषयांची ग्रंथालये बनली आहेत. बालसाहित्य, कादंबरीपासून ऐतिहासिक, ललित, पर्यावरण, विनोदी, स्त्री साहित्य, परिवर्तनवादी, समाजसुधारक, चरित्रे, लोकसाहित्य, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले अशा विविध विषयांच्या दालनात त्या त्या विषयांची पुस्तके विराजमान झाली आहेत. सध्या १५ हजारांहून अधिक तर पुढील काळात काही लाखांच्या संख्येतील पुस्तकांचा खजिना येथे उपलब्ध होणार आहे. या वेगळेपणामुळेच ज्याला ज्या विषयांत गोडी आहे, ती पुस्तके त्याला एकाच ठिकाणी वाचावयास मिळणार आहेत. विशिष्ट विषयांच्या अभ्यासकांसाठी तर ही पर्वणीच आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांनाही या उपक्रमाला भेट देऊन आपल्या भावी पिढ्यांना दिशा देण्याचे काम सहजपणे करता येणार आहे. त्यामुळेच भिलार म्हणजे केवळ पुस्तकांचे गाव नव्हे, तर ते विद्यार्थीवर्गासाठी ज्ञान, माहिती मिळविण्याचे, अभ्यास करण्याचे केंद्र ठरणार आहे. राज्यातून, जगभरातून पर्यटक येतील आणि या प्रकल्पतील पुस्तकांचा खजिना पाहतीलही; पण जिल्ह्यातील सर्वांनाच तिथे जाऊन पुस्तके वाचण्याची संधी मिळणार आहे. 
या संधीचा फायदा नाही घेता आला तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच ठरू, अशी भीती आहे. भिलारपुढील काळात वाचनसंस्कृतीचे तीर्थक्षेत्र म्हणूनही गणले जाईल. मात्र, या तीर्थक्षेत्रातील वारकरी म्हणून आपण समृद्ध होतो की नाही, तेही महत्त्वाचे ठरणार आहे. आपले संचित चांगले म्हणून हा प्रकल्प आपल्याजवळ साकारला आहे. शब्द अक्षरांसगे आपले सहजीवन समृद्ध करण्याची ही संधी दवडता कामा नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com