आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे.

कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्या टप्प्यात शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर, गडहिंग्लजमधून नंदाताई बाभूळकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने नेते आणि कार्यकर्तेही खचले आहेत. त्यामुळेच या सर्वांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे सूतोवाच केले आहे. वर्षानुवर्षे निवडणुका लढणाऱ्यांऐवजी उमेदवार बदलाचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आगामी काळात कोणाला संधी मिळेल, याची चर्चा सुरू आहे. 

शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निवडणूक लढली आहे; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे यड्रावकर यांना नवीन धोरणानुसार संधी मिळण्याची शक्‍यता आहे. चंदगड मतदारसंघातून आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभूळकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी मिळण्याची मोठी शक्‍यता आहे; पण काही वेळा बाभूळकर यांचे नाव भाजपसोबतही जोडले गेले होते. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. तसेच करवीरमधून निवडणूक लढलेले जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनाही संघटनेत महत्त्वाची जबाबदारी 
मिळू शकते.

नवीन नेतृत्वाला संधी शक्‍य
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. ते सातत्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाकरी परतण्याचे कारण देत माजी आमदार के. पी. पाटील यांच्याऐवजी ए. वाय. यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे; मात्र जर के. पी. यांचे पुत्र रणजित पाटील यांचे नाव पुढे आले तर आणखी पंचाईत होणार आहे. 

युवा चेहऱ्यांवर लक्ष
राष्ट्रवादीने युवा चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणा केली आहे. यात काही जणांना विधानसभेची लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. तसेच काहींना पक्षाच्या मुख्य प्रवाहात, संघटनात्मक जबाबदारी देण्याची शक्‍यता आहे. यात नावीद मुश्रीफ, रणजित पाटील, आदिल फरास, राजेश लाटकर यांच्यासह युवा जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, सदस्य सतीश पाटील, विनय पाटील, विजय बोरगे यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opportunity to youth by NCP in upcoming Assembly election