चौकीदार चोर है.. म्हणत नरेंद्र मोदींना दाखविले काळे झेंडे! 

परशुराम कोकणे
बुधवार, 9 जानेवारी 2019

चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मंगळवारपासूनच कडकोट सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. आंदोलन करण्याची शक्‍यता असलेल्या कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह अनेकांना सकाळीच ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांची धरपड सुरु होती. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम मैदानावर हेलीकॉप्टरने आगमन झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवरांनी मोदींचे स्वागत केले.

काही वेळातच त्यांच्या वाहनाचा ताफा पार्क स्टेडीअमवर पोचला. विविध विकास कामांच्या उद्‌घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी 50 मिनिटे भाषण केले. दुपारी 12.50 वाजता मोदींचे भाषण संपले. मोदींसह अन्य व्हीआयपींचा ताफा जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची गर्दी दिसून आली. याच गर्दीतून विविध ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है.., सरकार हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है.. अशी घोषणाबाजी केली. काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. काळे झेंडे दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: oppose to Narendra Modi s Rally ion solapur By congress