शिराळा नगरपंचायतीत कोरोना साहित्य खरेदीत गैरव्यवहार : विरोधक भाजप गटाचा आरोप

शिवाजी चौगुले
Tuesday, 29 September 2020

गेल्या सहा महिन्यात शिराळा नगरपंचायतीत सत्ताधाऱ्यांनी आपल्या पद व अधिकाराचा गैरवापर करून कोणालाही विचारात न घेता कोरोनाकाळात खरेदी केलेल्या साहित्यामध्ये गैरव्यवहार केला, असा आरोप विरोधक भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

शिराळा (जि. सांगली) : गेल्या सहा महिन्यात शिराळा नगरपंचायतीत सत्ताधाऱ्यांनी आपल्या पद व अधिकाराचा गैरवापर करून कोणालाही विचारात न घेता कोरोनाकाळात खरेदी केलेल्या साहित्यामध्ये गैरव्यवहार केला, असा आरोप विरोधक भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

याबाबत भाजप नगरसेवक म्हणाले, 400 रुपयांचे पीपीई किट 2500 हजार रुपयांना खरेदी केले आहे. मास्क, सानिटायझर, ग्लोव्हज्‌, ऑक्‍सिमीटर, थर्मल गन, थर्मामीटर अशा वस्तू खरेदी करताना 700 रुपयांची वस्तू 4000 हजार रुपयांना खरेदी केली आहे. यात नगराध्यक्षांनी कोणालाही विचारत घेतलेले नाही. सीसी टीव्ही. खरेदी टेंडर मर्जीतल्या लोकांना देण्याचा घाट घातला जात आहे.

मागील 6 महिने सर्वसाधारण सभा झाली नाही. त्यामुळे कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आम्हाला घेतलेले नाही. छोट्या छोट्या गावात येथील ग्रामपंचायत व सेवाभावी संस्थांनी कोविड सेंटर उभा केले आहे. शिराळा हे तालुक्‍याचे ठिकाण असून देखील, याठिकाणी नगरपंचायतने स्वतंत्र सेंटर उभा केलेले नाही. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. 

कोरोना काळात वेगवेगळ्या वस्तू आणि साहित्य जादा दराने खरेदी केल्या आहेत, या सगळ्याची चौकशी व्हावी. त्यासाठी चौकशी समिती स्थापन करावी. अनेक ठराव हे बेकायदेशीर पणे मंजूर केले आहेत. आम्ही विरोध केला असलेला ठरावदेखील सर्वानुमते मंजूर असा शेरा येत आहे. हा सगळा गलथान कारभार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून जनतेच्या हितासाठी आम्हाला न्याय देण्याची या नगरसेवकांनी मागणी केली आहे.

यावेळी उत्तम डांगे, केदार नलवडे, नेहा सूर्यवंशी, अभिजित नाईक, सीमा कदम, राजश्री यादव, वैभव गायकवाड हे नगरसेवक उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition BJP group alleges corruption in purchasing corona material in Shirala Nagar Panchayat