ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष काढणार मंत्रालयावर मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

ईव्हीएम मशिनबद्दल बरेच घोळ दिसून आले आहेत. लोकांचा ईव्हीएम मशिनवर विश्वास राहिलेला नाही ः पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर  ः भाजप सरकार कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून, तर काहींवर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडत आहेत. सत्तेचा इतका गैरवापर यापूर्वी कधीच झालेला नव्हता. तो सध्या भाजपकडून होत आहे. विरोधी पक्ष संपवणे व हुकूमशाही अंमलात आणण्याचे कारस्थान सत्ताधारी करीत आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील बूथ समितीच्या सदस्यांबरोबर संवाद साधताना आमदार चव्हाण बोलत होते. या वेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, यशवंतराव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते, कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष व मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, जयवंत जगताप, जिल्हा परिषद सदस्या मंगला गलांडे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, कऱ्हाड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, इंद्रजित चव्हाण, विवेक पाटील, नितीन थोरात, मलकापूर पालिकेचे नगरसेवक, तसेच 75 बूथ समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आमदार चव्हाण म्हणाले, ""कॉंग्रेसची देशात व राज्यात सत्ता असताना कायमच कॉंग्रेसच्या नेत्यांनी देशाच्या विकासाला प्राधान्य दिलेले आहे. पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळापर्यंत दूरदृष्टीने देशाचा विकास झाला. कॉंग्रेस एक विचार आहे. तो जनतेपर्यंत पोचवण्याचे काम कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी करावे. कॉंग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता हीच कॉंग्रेसची ताकद आहे. आज पक्षांतराचे जे पेव फुटले आहे त्याला सामान्य जनताच आपल्या मतदानाच्या हक्कातून उत्तर देईल.'' 
आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ""दिवंगत यशवंतराव मोहिते व आनंदराव चव्हाण हे त्याकाळी निवडणूक प्रचारासाठी बैलगाडीने गावोगावी जायचे. त्यावेळच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याप्रमाणे व निष्ठेने सर्व बूथ सदस्यांनी कॉंग्रेस विचारसरणी अंगी बाणवून काम करणे गरजेचे आहे.'' 
डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, ""आज लोकशाही वाचली तरच देश वाचेल; पण सत्ताधारी भाजप जात- धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामूळे या प्रवृत्ती विरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.'' 

ईव्हीएमविरोधात मोर्चा 
ईव्हीएम मशिनबद्दल बरेच घोळ दिसून आले आहेत. लोकांचा ईव्हीएम मशिनवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या विधानसभेला पत्रिकेवरच निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition parties will protest against EVM near mantralay