वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी देव पाण्यात

vasantdada
vasantdada

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद पडावा म्हणून विरोधकांनी देव पाण्यात घातलेत. दत्त इंडिया कंपनीसोबतच्या करारानंतर कारखाना उत्तम चाललाय, यंदा बारा लाख टनांहून अधिक गाळप होईल, हे विघ्नसंतोषी माणसांना बघवत नाही. त्यामुळेच कराराचा बाऊ करून कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा हल्लाबोल कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आज 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केला. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता बोचरी टीका केली. ते म्हणाले, "वसंतदादा कारखाना, दत्त इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा भाडेकरार झाला. त्यानंतर बॅंकेला वर्षात 63 कोटी रुपये भरले. बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळही समाधानी आहे. विघ्नसंतोषी लोक असमाधानी आहेत. कारखाना कात टाकून पुढे जायोत, त्यामुळे वाटेत काटे पेरले जाताहेत. यंदा उत्तम गाळप होईल, बऱ्यापैकी अडचणी दूर होतील. त्यामुळे हे लोक नाराज आहेत. राजकीय अडचणी आणल्या जात आहेत. हा कारखाना बंद पडावा, सारा ऊस आपल्या कारखान्याला यावा, असे काहींना वाटते. कराराला विरोधाचे तेच कारण आहे. अन्य कारखान्यांपेक्षा आपण पंधरा दिवस जास्त काळ 2900 रुपयाने उचल दिली, त्यामुळेही हे दुखावलेत.'' 

दरम्यान, सभासदांनी सन 2013-14 साली गाळप झालेल्या उसाच्या थकीत बिलांसाठी विशाल यांना धारेवर धरले. अनिल पाटील म्हणाले, ""यावर्षी मागचे थकीत पैसे दिल्याशिवाय आम्ही कारखाना चालू करू देणार नाही. उपोषणाला बसू. हा कारखाना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भाड्याने दिला असेल तर आधी शेतकरी, कामगारांची देणी भागवा.'' 

मार्तंड चव्हाण यांनी दारु विभागाचा हिशेब मागितला. कराराच्या प्रतीवरून चंद्रशेखर बुटाले यांनी जाब विचारला. विशाल यांनी मराठीत करार उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. रघुनाथ पाटील यांनी दहा वर्षे साखर दिली नाही, यंदा तरी द्या, अशी मागणी केली. प्रभाकर पाटील यांनी कारखाना पारदर्शीपणा चालवा, अशी भूमिका मांडली. कलगोंडा पाटील यांनी मिरज पूर्वमधून ऊस आणणार आहात की नाही, असा सवाल केला. बाळकृष्ण पाटलांनी वसंतदादा अभियांत्रिकी कॉलेजमध्ये सवलती देताना गफला होत असल्याबद्दल लक्ष वेधले. ऊस तोडणी मजुरांकडून अडवणूक होत असल्याची तक्रार झाली. उपाध्यक्ष सुनील आवटी यांच्यासह संचालक उपस्थित होते. 

भाजपमुळे सूड 
माजी प्रसिद्धी अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पत्नी मिनाश्री पाटील यांनी आपली व्यथा मांडली. मुलगा भाजपकडून महापालिका निवडणूक लढवत होता म्हणून सूड घेतला, दुसऱ्या मुलाला कामावरून कमी केले, असा आरोप केला. माझ्यावर अन्याय करू नका, असे आर्जव त्यांनी विशाल यांना केले. 

दत्त इंडिया नव्हे, इस्ट इंडिया कंपनी 
शेतकरी संघटनेचे युवा नेते प्रदीप पाटील यांनी दत्त इंडिया कंपनीवर हल्ला चढवला. ते म्हणाले, "ही दत्त इंडिया नव्हे तर इस्ट इंडिया कंपनी आहे. खूप मग्रुरीची भाषा अधिकारी वापरतात. त्यांना कसली मस्ती आहे. खोटे बोलतात, चुकीचा हिशेब देतात. खोटे उतारे, दर दाखवून लोकांना फसवत आहेत. त्यांच्यावर फौजदारी केली पाहिजे. त्यांनी यंदाचे 400 रुपये दोन दिवसांत दिले नाहीत तर 2 ऑक्‍टोबरपासून धरणे आंदोलन करू.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com