मटका बुकींच्या तडीपारीचे आदेश ; जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना फर्मान

प्रवीण जाधव
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

तडीपारीबरोबर ते हद्दीत खुलेआम फिरणार नाहीत, याचीही दक्षता पोलिस दलाकडून घेणे आवश्‍यक आहे. 

सातारा : जिल्ह्यातील मटका धंद्याचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील मटकाकिंग व बुकींवर तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. त्यामुळे मटका चालकांची लवकरच जिल्ह्यातून गठडी बांधली जाणार आहेत. मटका धंद्यामुळे कुटुंबे उद्‌ध्वस्त होण्याबरोबरच गुंडगिरीतही वाढ होत असल्याबाबतचा मुद्दा कऱ्हाडच्या प्रकरणानंतर "सकाळ'ने लावून धरला होता. 

कऱ्हाडमध्ये गुंडांनी केलेल्या गोळीबाराच्या धमक्‍यांमुळे संपूर्ण जिल्हाच हादरून गेला. जिल्ह्यातील गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था कोणत्या थराला जात चालली आहे, हेच यातून समोर आले. कऱ्हाड असो किंवा जिल्ह्यातील अन्य भागामध्ये युवकांना बेकायदा शस्त्रे सहज उपलब्ध होत आहेत. त्यातून सर्वसामान्यांवर दहशत माजविण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्वांना मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे, तो अवैध धंद्यामधून येणारा पैसा. कष्ट न करता भरमसाट पैसे कमविण्याच्या ओढीपायी युवक मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांकडे आकर्षित होत आहेत. त्यात प्रामुख्याने मटका व खासगी सावकारी याचा समावेश आहे. या धंद्यातून मिळणाऱ्या थेट पैशासाठी किंवा या धंदेवाल्यांची दहशत वाढवण्यासाठी युवकांची टोळकी कार्यरत आहेत. 
तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या धंदेवाल्यांचे कंबरडे मोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याची धास्तीच जणू जिल्ह्यातील कथित टग्यांनी घेतली होती. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर कारवाईची प्रक्रिया थंडावत गेली. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांनी जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. कऱ्हाडच्या घटनेमुळे ते प्रकर्षाने समोर आले. कऱ्हाडप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य भागातही मटका व खासगी सावकारांचा उच्छादच सुरू आहे. संदीप पाटील यांच्यानंतर आलेले पंकज देशमुख असोत किंवा तेजस्वी सातपुते यांचीही नेहमी अवैध धंद्यांविरोधी भूमिका राहिली. परंतु, प्रभारी अधिकारी व खालच्या कर्मचाऱ्यांकडून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पकड ढिली झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही वस्तुस्थिती "सकाळ'ने वारंवार मांडली. 
कऱ्हाडच्या घटनेनंतर याची पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार मटका धंदे चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना मटका धंदेवाल्यांचे संपूर्ण "रेकॉर्ड' तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्याच्या आधारे या धंद्यात गुंतलेल्यांना तडीपार करण्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यामध्ये मटका धंदेवाल्यांविरोधातील मोठ्या कारवाईला सुरवात होईल. त्यातून मटकाकिंग व बुकींना जिल्ह्यातून आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. 

तडीपारीनंतरही हवे लक्ष 

तत्कालीन अधीक्षक संदीप पाटील यांनी मटका धंदेवाल्यांविरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, तडीपारीनंतरही संबंधित धंदेवाले आपल्या हद्दीत वावरत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. काहींवर अनेकदा तडीपारी आदेशाचा भंग केल्याची कारवाईही करण्यात आली. परंतु, बहुतांश जणांवर ती होत नाही. हितसंबंध जपण्याच्या नादात पोलिस दलाच्या आणि त्या कारवाईच्या मूळ उद्देशाला तिलांजली मिळते. त्यामुळे तडीपारीबरोबर ते हद्दीत खुलेआम फिरणार नाहीत, याचीही दक्षता पोलिस दलाकडून घेणे आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to police stations about disposal of matka bookies