बोलक्या रेषांनी अस्सल कोल्हापुरी फटकारे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

पोस्टर पेंटिंगचं माहेरघर समजलं जाणारं कोल्हापूर. सुरवातीच्या काळात निवडणुका म्हटलं, की उमेदवारांची भव्य पोस्टर उभी राहायची. पण, बदलत्या काळात ती कालबाह्य झाली असली तरी हातातील मोबाईलमध्ये किंबहुना डिजिटल माध्यमातून जी काही प्रचाराची राळ उठली, त्यातही बोलक्‍या रेषांनीच या निवडणुकीत बाजी मारली.

कोल्हापूर - पोस्टर पेंटिंगचं माहेरघर समजलं जाणारं कोल्हापूर. सुरवातीच्या काळात निवडणुका म्हटलं, की उमेदवारांची भव्य पोस्टर उभी राहायची. पण, बदलत्या काळात ती कालबाह्य झाली असली तरी हातातील मोबाईलमध्ये किंबहुना डिजिटल माध्यमातून जी काही प्रचाराची राळ उठली, त्यातही बोलक्‍या रेषांनीच या निवडणुकीत बाजी मारली. अर्थात, या बोलक्‍या रेषांना अस्सल कोल्हापुरी शब्दांच्या फटकाऱ्यांची साथ मिळाली.

ऐंशी वर्षांपूर्वी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पोस्टरच्या एका नव्या परंपरेला सुरवात झाली, ती कलापूर कोल्हापुरातूनच. कलात्मक आणि आकर्षक सप्तरंगी या पोस्टरना भव्यता आली. थिएटर आणि शहरात भले मोठे पोस्टर आणि कटआउट त्याच काळात झळकू लागली. अगदी सचिन पिळगावकर यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटापर्यंत चित्रपटाचे पोस्टर मोठ्या प्रमाणात लावले जात होते.

मात्र, नंतरच्या काळात चित्रपटाबरोबरच निवडणुकीच्या प्रचारासाठी पोस्टर आणि कटआउटसची संकल्पना पुढे आली आणि सर्वत्र निवडणूक चिन्ह व उमेदवारांचे पोस्टर झळकू लागले. सुमारे चाळीस-पन्नास फूट उंचीचे कटआउट लोकांना सभेच्या स्थळी सरळ लावताही यायचे नाहीत, इतकी भव्यता यात होती. 

मात्र, हळूहळू हा ट्रेंडही मागे पडू लागला आणि सोशल मीडियाच्या प्रचारावर अधिक भर दिला जाऊ लागला. या निवडणुकीत तर उमेदवारांचे प्रचार फलक आणि कटआउटस्‌ सभांची ठिकाणे वगळता फारशी कुठेच दिसली नाहीत. मात्र, हातातल्या मोबाईलवर आलेल्या यंदाच्या प्रचारात बोलक्‍या रेषांनीच बाजी मारली.

‘थिंक टॅंक’ ठरला भारी..!
प्रचारादरम्यान सोशल मीडियावरून अनेक टॅगलाईन, कार्टुन्स आणि ग्राफिक डिझाईन्स शेअर झाली. मात्र, ती तयार करतानाच उमेदवारांच्या थिंक टॅंकनं सर्व प्रकारचा अभ्यास केला होता. अगदी कोल्हापुरात कुठला शब्द लोकांना भावतो इथपासून ते कोल्हापूरकरांच्या एकूणच मानसिकतेपर्यंतचा विचार झाला. त्यातूनच टॅगलाईन, टिझर असोत किंवा व्हिडिओतील संवादांची रचना झाली. अर्थातच, उमेदवारांच्या ‘थिंक टॅंक’ला अपेक्षित बोलक्‍या रेषांचे अस्सल कोल्हापुरी शब्दातील फटकारे दिले ते येथील व्यंग्यचित्रकार, ग्राफिक डिझायनर आणि स्लोगन आर्टिस्टनी.

Web Title: originally Kolhapuri Speaking lines gets market in Election