दोन तरुणींनी ‘धूम स्टाईल’ने लांबवले दुकानातून दागिने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सांगली - हरभट रस्त्यावरील मे. सीताराम पांडुरंग नार्वेकर या सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तरुणीने भरदिवसा दीड तोळ्याचे सोन्याचे वेढण घेऊन साथीदार तरुणीच्या सहाय्याने पलायन केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला.

सांगली - हरभट रस्त्यावरील मे. सीताराम पांडुरंग नार्वेकर या सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तरुणीने भरदिवसा दीड तोळ्याचे सोन्याचे वेढण घेऊन साथीदार तरुणीच्या सहाय्याने पलायन केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. दोन तरुणींनी ‘धूम स्टाईल’ने प्रथमच दुचाकीवरून दागिने लांबवल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. एक तरुणी दुकानातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाली.

पोलिसांनी माहिती दिली, की सुरेश सीताराम  नार्वेकर (वय ५५, खणभाग) यांच्या मालकीचे मे. सीताराम नार्वेकर हे दुकान हरभट रस्त्यावर आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांनी दुकान उघडले. दुपारी एक वाजता बंद केले. त्यानंतर अडीच वाजता दुकान उघडले. त्यांचे मित्र मधुकर बेलवलकर दुकानात होते.

दुपारी तीन वाजता तरुणी दुकानात आली. तिने सोन्याचे वेढण खरेदी करायचे आहेत, असे सांगितले. वेगवेगळ्या प्रकारचे वेढण तिने पाहिले. एक तोळ्याचे व अर्धा तोळ्याचे असे दोन वेढण पसंत केले. वेढण हातात घेतल्यानंतर तिने पैसे नसल्याचे सांगून ‘एटीएम’ कोठे आहे? असे विचारले. तेव्हा सुरेश यांनी शेजारीच अपना बॅंकेचे एटीएम असल्याचे सांगितले.

काही सेकंदातच तरुणी वेढण हातात घेऊन दुकानातून बाहेर पळाली. सुरेश यांना प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मित्राला तिला पकडा, असा आरडाओरडा केला. तिच्यामागे धावले. तेवढ्यात दुकानासमोर थांबलेल्या पांढऱ्या रंगाच्या ॲक्‍टीव्हाच्या मागे ती बसली. गाडी चालवायला देखील तरुणीच होती. तिने तत्काळ ‘धूम स्टाईल’ने गाडी पळवली.

शहरातील मुख्य, वर्दळीच्या रस्त्यावर दोन तरुणीने भरदिवसा चलाखीने दागिने लंपास केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ४० हजारांचे दागिने चोरी केल्याप्रकरणी दोन अज्ञात तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: ornament robbery on Harbhat Road in Sangli