नेता पावर फुल्ल..पत्ता करतो गुल..तरुणाईची पवारांनाच साथ

सिद्धार्थ लाटकर
रविवार, 22 सप्टेंबर 2019

माजी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे हे राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीच्या मेळाव्यास शरद पवार साताऱ्यात आले होते.

सातारा ; "मी राष्ट्रवादी, "मी साहेबां सोबत' तसेच "मी शरद पवार' असे लिहिलेल्या टोप्या घालून "एकच नेता एकच आवाज शरद पवार... शरद पवार' असा शरद पवार यांचा जयघोष करणाऱ्या हजारो युवकांनी हलगी पासून ढोल ताश्‍यांपर्यंतच्या वाद्यांचा गजरात काढलेल्या रॅलीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज (रविवार) साताऱ्यात जोरदार स्वागत करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमधून पवार हे विराजमान झाले. हजारो युवकांच्या समवेत पोवई नाका येथे रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी "" तो पत्ता करतो गुल..आमचा नेता पॉवर फुल्ल' या गीतावर युवकांनी सतत ठेक्‍यावर नाच सुरु ठेवत शरद पवार यांच्यासमवेतच आम्ही खंबीरपणे आहोत अशी ग्वाही दिली. 

माजी केंद्रिय मंत्री शरद पवार आज कर्मवीर भाऊराव पाटील जयंती कार्यक्रमासाठी आज (रविववार) साताऱ्यात आले होते. माजी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे हे राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच पक्षाच्या मेळाव्यासाठी श्री. पवार साताऱ्यात आले होते. साहेबांचे स्वागत पुर्वीच्याच जोषाने होते की कसे याबद्धल नागरीकांत उत्सुकता होती. त्यापार्श्‍वभुमीवर पवार यांचे येणे कार्यकर्त्यांना "स्फुर्तीदायक' ठरले.

साहेब येणार म्हटल्यावर आज (रविवार) जिल्ह्याच्या विविध भागातून युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे आले होते.आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि हजारो कार्यकर्त्यांनी पोवई नाक्‍यावर पवार यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. सर्वांनी "मी राष्ट्रवादी, "मी साहेबां सोबत' तसेच "मी शरद पवार' असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. श्री. पवार पोवई नाक्‍यावर येताच कार्यकर्त्यांनी "शरद पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', "देश का नेता कैसा हो.. शरद पवार जैसा हो' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्‍यांच्या माळा फुटत होत्या. अशा वातावरणात श्री. पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांचा जयघोषाचा गजर अव्याहत सुरु होता.

त्यानंतर श्री. पवार उघड्या जीपमध्ये बसले. तेथून रॅली जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे बॉम्बे रेस्टारंट चौकात गेली. तेथून हॉटेल कल्याण रिसॉर्ट येथे रॅली गेली. रॅलीत मोटारसायकलसह युवक मोठ्या संख्येन सहभागी झाले होते. रॅली पुढे वाद्यांचा गजर अखंडपणे सुरु होता. गळ्यात पक्षाचा मफलर घालून राष्ट्रवादी झेंडे नाचवत युवक नाचत जयघोष करत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our leader Power Full, rally in satara