शेतकऱ्यांचे थडगे बांधून विकास करू देणार नाही -  राजू शेट्टी

हेमंत पवार    
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड :  शेतकऱ्यांचे थडगे बांधून विकासाचे मनोरे कोणत्याही परिस्थितीत बांधून देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. केंद्र सरकार एफआरपीमध्ये दोनशे रुपयांची वाढ केली असे सांगत असले तरी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून, सरकारला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेत त्याचा जाब विचारला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कऱ्हाड :  शेतकऱ्यांचे थडगे बांधून विकासाचे मनोरे कोणत्याही परिस्थितीत बांधून देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. केंद्र सरकार एफआरपीमध्ये दोनशे रुपयांची वाढ केली असे सांगत असले तरी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून, सरकारला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेत त्याचा जाब विचारला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कोपर्डे हवेली (ता.कऱ्हाड) येथे आयोजित रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आणि जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेच्या तयारीसाठी आयोजित मेळाव्यात खासदार शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष नलवडे, अनिल घराळ, संदीप राजोबा, शंकरराव हिंदुराव चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले, माझी संघटना ही स्वाभिमानी शेतकर्‍यांची संघटना असून ती कोणाच्याही दावणीला बांधलेली नाही. संघटनेच्या माध्यमातून गेली 17 वर्षे 400 रुपयांपासून तीन हजार रुपयापर्यंत  शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेकदा तुरुंगात जावे लागले. सरकारकडून अनेकदा संबंध नसतानाही खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. मात्र त्याला भीक न घालता शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना लढल्याशिवाय काही मिळत नाही ही गेल्या अनेक वर्षांपासूनची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या विरोधात लढा उभारणे गरजेचे आहे. तुम्हाला न्याय मिळेल त्यासाठी तुमच्या पाठीशी मी छातीचा कोट करुन खंबीरपणे उभा राहीन. शेतकऱ्यांचे थडगे बांधून विकासाचे मनोरे उभारणाऱ्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांबरोबरच राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. 

ते म्हणाले, केंद्र सरकार यावर्षी एफआरपीत 200 रुपयांनी वाढ केली असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि यंदाच्या उसाच्या दराचे धोरण ठरवण्यासाठी जयसिंगपूर येथे 27 ऑक्टोबरला उस परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सरकारकडून कशी फसवणूक झाली आहे हे जाहीर करून कारखान्यांनी यंदा पहिला हप्ता किती द्यावा हे तेथे उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवले जाईल. त्यास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही खासदार शेट्टी यांनी यावेळी केले.

Web Title: our support is with farmers - raju shetty