देशातील ५० सुंदर घरांत ‘ओव्हन हाऊस’

सुधाकर काशीद
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

कोल्हापूर - देशातील पन्नास सुंदर घरांचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये येथील आर्किटेक्‍ट सुनील पाटील यांनी इचलकरंजीत बांधलेल्या ओव्हन हाऊस या घराचा सन्मानपूर्वक समावेश झाला आहे. याशिवाय आर्किटेक्‍ट शिरीष बेरी यांनी नागपूर येथे व आर्किटेक्‍ट सचिन पाटील यांनी झारखंडमध्ये बांधलेल्या घरांचाही या पन्नासात समावेश आहे.

कोल्हापूर - देशातील पन्नास सुंदर घरांचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये येथील आर्किटेक्‍ट सुनील पाटील यांनी इचलकरंजीत बांधलेल्या ओव्हन हाऊस या घराचा सन्मानपूर्वक समावेश झाला आहे. याशिवाय आर्किटेक्‍ट शिरीष बेरी यांनी नागपूर येथे व आर्किटेक्‍ट सचिन पाटील यांनी झारखंडमध्ये बांधलेल्या घरांचाही या पन्नासात समावेश आहे.

कोल्हापूरच्या या तीन आर्किटेक्‍टनी स्थापत्यशैलीत कोल्हापूरची एक वेगळी ओळख या निमित्ताने देशभरात निर्माण केली आहे. व्हाईट फ्लॅग मीडिया ॲन्ड कम्युनिकेशनच्या वतीने हे बुक प्रकाशित केले जाते. केवळ आफाट पैसे खर्च करून बांधलेला बंगला म्हणजे सुंदर असे नव्हे, तर राहणाऱ्यांची गरज व तेथे राहणाऱ्यांना वाटली जाणारी प्रसन्नता अशा अंगांनी सुंदर घर ही संकल्पना मानली जाते.

इचलकरंजीत सातपुते यांचे ओव्हन हाऊस हे घर पन्नास सुंदर घरांच्या यादीत आले आहे. हा एक स्वतंत्र बंगला असला तरी ‘हम दो हमारे दो’ अशी यात राहणाऱ्यांची संख्या नाही. सातपुते कुटुंबातील तीन पिढ्या येथे रहातात. त्यामुळे घरात गर्दी असूनही प्रसन्नता, निवांतपणा आहे.

इचलकरंजी ही सुताची नगरी. त्यामुळे दगडी भिंती सुताच्या आडव्या धाग्यांच्या रचनेत बांधण्यात आल्या. मोठे स्वयंपाकघर, तीन मास्टर बेडरूम, दोन चिल्ड्रेन बेडरूम, एक गेस्ट बेडरूम व दिवाणखाना (हॉल) अशी या बंगल्याची रचना आहे. आर्किटेक्‍ट सुनील पाटील यांनी ही रचना करताना नैसर्गिक प्रकाश व नैसर्गिक हवा जास्तीत जास्त या घरात खेळत राहील, अशी बांधणी केली आहे. त्यांच्या मते अफाट पैसा खर्च करून झकझकी, लखलखीत घरापेक्षा घराच्या प्रसन्नतेला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. हे घर जसे चांगले, तशी त्याची विविध कोनांतून संजय चौगुले यांनी काढलेली जीवंत छायाचित्रेही या घराच्या निवडीला हातभार लावणारी ठरली.
या कॉफी टेबल बुकमध्ये आर्किटेक्‍ट शिरीष बेरी यांनी नागपूरमध्ये बांधलेल्या गांधी फार्म हाऊसचा व सचिन पाटील यांनी छत्तीसगडमध्ये बांधलेल्या निरंकारी हाऊसचा समावेश आहे.

शिरीष बेरी यांनी नागपूरमध्ये बांधलेले फार्म हाऊस दगड-विटा सिमेंटपेक्षा प्लॉटवरील नैसर्गिक झाडांचा अतिशय परिणामपूरक वापर करून घेतला आहे. गुळगुळीत भिंतीचे घर ही पारंपरिक संकल्पना त्यांनी मोडून टाकली आहे. सचिन पाटील, शीतल पाटील यांनी छत्तीसगडमध्ये बांधलेले घर म्हणजे तेथील उष्ण व कोरड्या हवेची तीव्रता कमी करणारी एक स्थापत्य रचना आहे.  

कॉफी टेबल बुकमध्ये देशातील इतर नामांकित आर्किटेक्‍टच्या ५० घरांचा समावेश आहे. त्यांच्याही रचना खूप चांगल्या आहेत; पण कोल्हापूरचे तीन आर्किटेक्‍ट यांचा व कोल्हापुरातील एका घराचा समावेश यांमुळे कोल्हापूरची एक वेगळी ओळख स्थापत्य व बांधकाम क्षेत्रात होणार आहे.

घराला किती लाख, किती कोटी खर्च आला याला स्थापत्य कलेत फार महत्त्वाचे स्थान नाही. घर किती प्रसन्न, किती हवेशीर, किती नैसर्गिक प्रकाशमान आहे यावर त्याची सुंदरता ठरते. याहीपेक्षा आर्किटेक्‍टच्या कलेपेक्षा ज्यांचे घर आहे त्यांची नेमकी गरज घराने पूर्ण केली आहे का, याला जास्त महत्त्व आहे.
-  सुनील पाटील, आर्किटेक्‍ट

Web Title: oven house in beautiful house