काँग्रेस पक्षातील भांडणे सोडविण्यातच गेली २० वर्षे

काँग्रेस पक्षातील भांडणे सोडविण्यातच गेली २० वर्षे

कोल्हापूर - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा वीस वर्षांचा मोठा काळ गेला. हा काळ कसोटीचा होता. प्रत्येक तालुक्‍यातील भांडणे सोडविताना नेहमी मलाच दोषी धरले गेले. पक्षांतर्गत भांडणे मिटविण्यातच माझी वीस वर्षे गेली, अशी कबुली जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी दिली.

माजी आमदार पी. एन. पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, ‘महाडिक-सतेज पाटील, राधानगरीत दिनकर जाधव-बजरंग देसाई, शाहूवाडीत गायकवाड बंधू, कागलमध्ये विक्रमसिंह घाटगे आणि संजय घाटगे, इचलकरंजीत आवाडे-आवळे हे सर्व वाद मिटविताना नेहमी मलाच दोषी धरले. त्यामुळे वीस वर्षे माझा हा काळ दोषी राहण्यातच गेला आहे. आता ही जबाबदारी आवाडेंच्यावर आली असून आवाडेंना या गोष्टीचा सामना करावा लागेल; पण आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी राहू.’’

जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, ‘जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून कायम ठेवण्यात माजी आमदार पी. एन. पाटील यांचा मोठा वाटा आहे. यापुढे पी. एन. पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते हातात हात घालून पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करतील आणि जिल्ह्यात सहा आमदार निवडून आणतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पी. एन. पाटील यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले होते; पण वीस वर्षांच्या काळात त्यांनी काँग्रेससाठी जिवाचे रान केले आहे. संकटे आली, वादळे आली तरी त्यांनी आपली पक्षनिष्ठा कायम ठेवली आहे.’

माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, ‘आम्ही नेत्यांनी वाद मिटविले आहेत. काँग्रेसच्या भल्यासाठी हा वाद आम्ही संपविला असून आता आवाडे दादा आणि राजूबाबा आवळे हे दोघेही येत्या निवडणुकीत आमदार होतील.’’

या वेळी प्रकाश सातपुते, नामदेवराव कांबळे, माजी आमदार दिनकरराव जाधव, संजीवनीदेवी गायकवाड, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साळोखे, जिल्हा बॅंकेच्या सदस्या उदयानी साळोखे, उपमहापौर भूपाल शेटे, बाळासाहेब सरनाईक, सचिन चव्हाण, उदयसिंह पाटील कौलवकर, बाळासाहेब खाडे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद का गेली?
ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा खोचगे जिल्हाध्यक्ष आवाडे यांचे भाषण सुरू असतानाच उभे राहिले आणि म्हणाले, ‘तुमचे तासाला बोलणे बदलते, आधी आम्हाला सांगा जिल्हा परिषद का गेली.’ या वेळी जिल्हाध्यक्ष आवाडे यांनीही शांतपणे खोचगे यांचे म्हणणे ऐकले. तुम्ही मोकळे व्हा. काय आहे ते बोला, असे सांगितले. त्यानंतर आवाडे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी आमचीच तिकिटे कापली, त्यामुळे तो राग होता. जिल्हा परिषद का गेली, याचे उत्तर आवळे आणि पी. एन. पाटीलच देतील; पण एक सांगतो, ज्या दिवशी मी जिल्हाध्यक्ष झालो, त्याच दिवशी सांगितले की, येणारा जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच असेल आणि सत्ताही आमचीच असेल.’’ यावर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com