विकासाची केवळ संकल्पना नको; हवी कृती

रविकांत बेलोशे
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर पुन्हा अनेक समस्यांची आव्हाने घेऊन पदावर  

पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर पुन्हा अनेक समस्यांची आव्हाने घेऊन पदावर  
भिलार - पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या जनतेतून थेट झालेल्या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी पुन्हा एकदा दमदार विजय संपादित केला. कऱ्हाडकर यांनी आजवर शहराच्या विकासासाठी मोठी कल्पकता दाखवलेली आहे. आगामी काळात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या व प्रलंबित विकासकामे तडीस नेत नव्या विकासाच्या संकल्पना राबवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. परंतु, त्यासाठी त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मोठी आव्हाने घेऊन त्या पुन्हा एकदा नगराध्यपदावर विराजमान होणार आहेत.

पाचगणी हे पर्यटनस्थळ आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनीच आपल्या परीने हातभार लावला आहे. येथे येणाऱ्या देशविदेशी पर्यंटकांवर येथील जीवनमान खरे तर अवलंबून आहे. अलीकडच्या काळात पाचगणीकडे पर्यटकांचा ओढा कमी राहिला असल्याचे जाणवू लागले आहे. असणारा ओढा हा महाबळेश्‍वर ‘फुल्ल’ झाल्यावर दिसतो. पाचगणीतील टेबल लॅंड, सिग्ने पॉइंट व पारशी पॉइंट सोडल्यास पाचगणीत पर्यटकांना रेंगाळण्यासाठी कुठल्याही नव्या पर्यटनस्थळाची निर्मिती झालेली दिसत नाही. पर्यटकांना दिवसभर पाचगणीत थांबवून ठेवण्यासाठी नव्या पर्यटनस्थळांबरोबर इतर कल्पकता दाखवण्याचे मोठे आव्हान पालिका पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.

दुसरीकडे येथे जागा खरेदी करून आपला टुमदार असा बंगला उभारण्याची सध्या येथे स्पर्धा सुरू आहे. मुंबई-पुण्याच्या लोकांचा ओढा वाढू लागला आहे. मग बांधकामांसाठी बेसुमार वृक्षतोड होताना दिसते. परिणामी निसर्गसंपदेची रया जाऊ लागली आहे. निसर्गाच्या मुळावर उठलेल्या या राक्षसी अशा वृत्तीला वेळीच रोखून पर्यावरण वाचवण्याबरोबरच नव्या बांधकामधारकांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले पाहिजे. या दोन गोष्टींवर भर दिला तर पाचगणीच्या पर्यटनाला गतवैभव प्राप्त होणार आहे.

पाचगणीत असणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शैक्षणिक संस्था याही शहराचे वैभव आहेत. देशविदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. अलीकडे या विद्यार्थ्यांची संख्याही रोडावली आहे. या संस्थांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शासकीय नियम धाब्यावर बसवून या शाळांची मनमानी सुरू आहे. भरमसाट फीमुळे स्थानिक व गरिबांना शिक्षण दुरापास्त होऊ लागलेले आहे. त्यावर पालिका शिक्षण विभागाने लक्ष घालून स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पाचगणी शहरात वाढत्या वाहनांच्या संख्येने पार्किंगची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यावर ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. यावर पालिकेच्या मार्केटमध्ये मोठ्या शहरांच्या धर्तीवर पार्किंग व व्यावसायिक गाळे तयार केल्यास पार्किंगच्या समस्येवर उत्तर मिळू शकते. यासाठी मोठा निधी मिळवण्यासाठी नगराध्यक्षांना कसरत करावी लागणार आहे. तर पाचगणीची कबड्डी महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. तर फुटबॉल, क्रिकेट, बॉस्केटबॉलसह इतरही राज्यपातळीवरील स्पर्धा येथे होत असतात. राज्य व देशपातळीवरील खेळाडू पाचगणीत तयार होण्यासाठी सुसज्ज अशा क्रीडासंकुलाचाही प्रश्‍न भेडसावत आहे. पालिकेनेही याबाबत आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम नगराध्यक्षांपुढे असणार आहे.

शहराच्या स्वच्छतेचा प्रश्‍न बऱ्यापैकी निकाली काढण्यात नगराध्यक्षा यशस्वी झाल्या असल्या तरी कचऱ्याच्या प्रश्‍नावर आणखी गतिमान पद्धतीने काम करणे गरजेचे वाटते. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वर्षानुवर्षे पडून असणारी वाहने काढली तर त्या रस्त्यांवरून वाहतूकही सुरळीत होईल. बुधवारच्या आठवडे बाजारातील विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या विक्रेत्यांना जागेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यावरही ठोस कार्यवाहीची गरज वाटत आहे. पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमधील खेळण्यांच्या दुरवस्थेची पाहणी करून मुलांसाठी खेळण्याचे असणारे हे एकमेव ठिकाण नव्याने विकसित होणे आवश्‍यक आहे. टेबल लॅंडवरील व्यावसायिकांचा प्रश्‍न बरेच वर्षे रेंगाळत आहे. या व्यावसायिकांच्या प्रश्‍नावर सकारात्मकतेने विचार करून तो सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. येथील ‘एफएसआय’चा (चटईक्षेत्र वाढ) प्रश्‍न हा मोठा आहे. चटईक्षेत्रासाठी १९६७ नंतर १९८२ मध्ये या नियमांची पुनर्रचना झाली. त्यानंतर कसलाही बदल झालेला नाही.

लोकसंख्या वाढली. परंतु, यातील किचकट नियमांमुळे नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या नियमात सुधारणा करण्यासाठी नगराध्यक्षांना प्रयत्न करावा लागणार आहे. लीज वाढीचा प्रश्‍नही पाचगणीत प्रलंबित आहे. नियम लागू करून लीज वाढवल्यास पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे. धनिक मात्र शासकीय नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावत आपले मनाप्रमाणे इमले बांधत आहेत. या प्रश्‍नावर ठोस काम करणे गरजेचे आहे. गावठाणवाढीचा प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहे. त्यावर नगराध्यक्षांना काम करावे लागणार आहे. इको सेन्सिटिव्ह झोनबाबतही पुनर्विचार होणे गरजेचे आहे. हेरिटेज प्रॉपर्टींबाबतही मोठा प्रश्‍न नागरिकांना सतावत आहे. 

नव्या पर्यटनस्थळांची निर्मिती...
कचरा, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज, रस्ते हे प्रश्‍न सोडवण्यासाठी पालिका नेहमी आघाडीवर असते. या प्रश्‍नांसाठी आतापर्यंतच्या सर्वच राजकारण्यांनी आपापल्या पद्धतीने विकासाचा गाढा पुढे ओढला आहे. परंतु, पर्यटनवाढ, नव्या पर्यटनस्थळांची निर्मिती, पार्किंग, टेबल लॅंडवरील व्यावसायिकांचा प्रश्‍न, लीज, चटईक्षेत्र वाढ, स्थानिकांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न, इको सेन्सिटिव्हचा प्रश्‍न, लहान मुलांच्या खेळण्याची बाग, सुसज्ज क्रीडांगण, हेरिटेज प्रॉपर्टी, आठवडे बाजारातील वाढत्या भाजी विक्रेत्यांच्या बैठकीचा प्रश्‍न अशा एक ना अनेक नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांकडे नव्या नगराध्यक्षांना विशेष लक्ष देऊन पाचगणीचा विकास साधता येणार आहे.

Web Title: pachgani municipal development