पाचगणी टोल नाक्‍यावर ‘दादागिरी’त वाढ

Toll-naka
Toll-naka

भिलार - पाचगणी टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांची ‘दादागिरी’त वाढ झाली असून, ही दबंगगिरी स्थानिकांना त्रासदायक ठरत आहे. दारूच्या नशेत बेधुंद असणाऱ्या टोल वसुली कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा नुकताच दस्तुरखुद्द स्थानिक लोकप्रतिनिधींना अनुभवण्यास मिळाला.

पाचगणी या पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून दांडेघर नाक्‍यावर पर्यटन, प्रदूषण असे विविध कर वसूल केले जातात. पूर्वी गिरिस्थान नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत ही वसुली केली जात होती. परंतु, आता पालिका प्रशासनाने खासगी ठेकेदारी पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. हे ठेकेदार बाहेरचे असल्याने या ठिकाणांवरील स्थानिकांचे त्यांना काहीही देणे-घेणे नाही. गाड्या अडवून फक्त पैसे उकळणे हाच धंदा त्यांचा सध्या सुरू आहे. गाड्या अडवून करवसुली करण्यासाठी कसलीच शिस्तबद्धता नाही.

दहा ते १५ कर्मचारी एका ओळीमध्ये उभे राहून गाड्या थांबवल्या जात आहेत. पर्यटकांभोवती घोळका करून अक्षरशः दहशतीखाली कर वसुली केली जाते. भाषासुद्धा अर्वाच्च असून, पर्यटकांना दमात घेतले जात आहे. गाडी पुढे गेली तर गाडीमागे धावत जाऊन गाड्या अडवल्या जात आहेत. टोलचे दरपत्रकही नाक्‍यावर लावले गेलेले नाही. त्यामुळे पर्यटकांना हुज्जत घालावी लागते. बरेचसे कर्मचारी दारूच्या नशेत नेहमी तर्रर आढळतात. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून याबाबत जाब विचारला असता चष्म्यातून पाहायला मिळेल, अशा आकड्याचे दरपत्रक लावले आहे.

नुकताच ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, गणपत पार्टे आणि प्रवीण भिलारे हे वाईहून पाचगणीकडे येत असताना दांडेघर नाक्‍यावर आम्ही स्थानिक आहोत, असे सांगूनही गाडी अडवण्याचा प्रताप कर्मचाऱ्यांनी केला. बेफाम दारू पिलेला एक कर्मचारी चालू गाडी अडवण्यासाठी रस्त्यात आला. अशा वेळी जर ब्रेक लागला नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो, याची जाणीवही या कर्मचाऱ्यांना नसावी. आम्ही स्थानिक असल्याचे सांगूनही तो ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी हुज्जत घालून गोंधळ करू लागला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारे मनगटशाहीने टोल वसुली होत असेल तर स्थानिक मात्र, हे कदापिही खपवून घेणार नाहीत. अशा प्रकारची दंडेलशाही आम्ही चालू देणार नसून, स्थानिकांना जर त्रास दिल्यास त्याचे परिणाम नाका प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

पर्यटक शहरात प्रवेश करताना घेताहेत धसका!
पाचगणी हे पर्यटनस्थळ असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना प्रवेशद्वारावरच आपुलकीची वागणूक मिळायला हवी. परंतु, टोल नाका कर्मचारी झुंडशाहीने वसुली करत असल्याने पर्यटक ही शहरात प्रवेश करण्याअगोदरच धसका घेत आहेत. संबंधितांनी शिस्तबद्धपणे वसुली करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com