श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ साकारतेय धातूचित्र शिवसृष्टी

राजशेखर चौधरी
शनिवार, 30 जून 2018

या कोरीव शिल्पकला शिवसृष्टीत शिवाजी महाराजांच्या जन्मापासून महानिर्वाणापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचा कलाविष्कार आहे. त्यातून एकूण ताम्रपटावरील ६३ धातूंचित्रे तयार केली जाणार आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्शवत जीवनपट उलगडून दाखविला जाणार आहे.

अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ कोरीव कलेवर आधारित धातूचिञ शिवसृष्टी साकारत असून त्याचे काम वेगात सुरू आहे. येत्या गुरुपौर्णिमेस त्याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे.

या कोरीव शिल्पकला शिवसृष्टीत शिवाजी महाराजांच्या जन्मापासून महानिर्वाणापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचा कलाविष्कार आहे. त्यातून एकूण ताम्रपटावरील ६३ धातूंचित्रे तयार केली जाणार आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्शवत जीवनपट उलगडून दाखविला जाणार आहे. अक्कलकोट येथे येणारे स्वामी भक्त आणि तालुकवासियाना येत्या काळात ही शिल्पसृष्टी पाहायला मिळणार आहे. ही शिवसृष्टी ५० फूट बाय ३० फूट जागेत उभारली जात असून यासाठी एकूण ६० लाख रुपये खर्च केले जात आहेत. संपूर्ण जगात प्रथमच संजय राऊळ यांच्या संकल्पनेतून  ही हुबेहूब अशी शिल्पकला ताम्रपटावर कोरून तयार करण्यात येत आहे. महाराजांच्या जीवनातील महत्वाचे किल्ले,राज्याभिषेक सोहळा यासह जीवनपट तयार करण्यात येत आहे. हे शिल्प पुण्याचे शिल्पकार संजय राऊळ हे तयार करीत आहेत. अन्नछत्र मंडळात ही देखणी धातूंचिञ शिल्पसृष्टी उभारण्यासाठी प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले,सचिव शाम मोरे,उपाध्यक्ष अभय खोबरे आणि विश्वस्त मंडळ प्रयत्नशील आहेत.

''गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतून व इच्छेनुसार अक्कलकोट येथे येणाऱ्या स्वामी भक्तात शिवचरित्राच्या माध्यमातून इतिहास डोळ्यासमोर उभा राहावा आणि याच्या प्रेरणेने त्यांच्यात राष्ट्रभक्ती आणि सकारात्मक ऊर्जा सतत निर्माण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.लवकरच याचा लोकार्पण सोहळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.''                                                                                       -जन्मेजय भोसले,
अध्यक्ष अन्नछत्र मंडळ

''हे ताम्रपट शिल्प जमिनीत गाडा, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात बुडवा अथवा आगीच्या भक्षस्थानी पडली तरी नष्ट न होणारे व चिरकाल टिकणारे हे कोरीव शिल्प आहे.शिवचरित्र बरोबरच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनपटाशी संबंधित सहा शिल्प तयार करून लावले जाणार आहे.हे शिल्प तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे.''                                                                                                           -संजय राऊळ
शिल्पकार

Web Title: Paintings of Shivaji Maharaj