पाकिस्तानची साखर, गुजरातचे दूध मुख्यमंत्र्यांना भेट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पारनेर तहसील कार्यालयात तहसीलदार भारती सागरे यांच्यामार्फत पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर व गुजरात, कर्नाटकचे दूध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून पाठविले. या वेळी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

पारनेर - भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पारनेर तहसील कार्यालयात तहसीलदार भारती सागरे यांच्यामार्फत पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर व गुजरात, कर्नाटकचे दूध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून पाठविले. या वेळी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, संजय वाघमारे, रामदास घावटे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, शरद पवळे, प्रवक्ते संतोष हांडे, युवक तालुकाध्यक्ष रोहन आंधळे, संजय भोर, अर्जुन रोकडे, सुनील मुळे, संजय भोर, संतोष गागरे, नंदन भोर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वाडेकर म्हणाले, "संपूर्ण देशातील शेतकरी संकटात सापडला असून, कोणत्याही शेतमालाला भाव नाही. उसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडासा हातभार मिळत होता; परंतु, सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात केली. परिणामी, साखरेचे भाव पडले. एकूणच, शेतकऱ्यांच्या मानेवर सुरी चालविण्याचे काम हे सरकार करीत आहे. दुधाच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. सरकारने गेल्या वर्षी दुधाला प्रतिलिटर 27 रुपये भाव जाहीर केला; परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्याला 17 रुपये मिळतात. सरकारने आयात-निर्यात, शेतकरीविरोधी धोरणे ताबडतोब बंद करावीत व देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण स्वीकारावे, अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटना व अन्य शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.

Web Title: Pakistan Sugar and Gujarat milk gifted for Chief Minister