पालखीच्या चारही मुक्कामी पोलिस बंदोबस्त सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

लोणंद - श्री संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस दल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी सर्व त्या तयारीनिशी सज्ज झाले आहे, अशी माहिती फलटण विभागाचे पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे व लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.

लोणंद - श्री संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस दल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी सर्व त्या तयारीनिशी सज्ज झाले आहे, अशी माहिती फलटण विभागाचे पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे व लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.

श्री संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी जिल्ह्यात आगमन होत आहे. लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे पालखी सोहळ्याचा प्रत्येकी एक मुक्काम आहे. या काळात वारकरी व भाविकांना सर्व प्रकारची सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. विविध मार्गावरील वाहतुकीत बदल करून वाहतुकीची व्यवस्था केली आहे. चार अपर पोलिस अधीक्षक, चार पोलिस उपअधीक्षक, 15 पोलिस निरीक्षक, 59 सहायक पोलिस निरीक्षक, 465 पुरुष पोलिस कर्मचारी,100 महिला पोलिस कर्मचारी व 120 वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस कर्मचारी अशी एकूण 764 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. 450 होमगार्डचीही बंदोबस्तासाठी नेमणूक केली आहे. पालखी सोहळ्याचे आगमन, मुक्काम, गर्दीच्या ठिकाणी गुन्हेगार, समाजकंटकांवर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच महिलांची छेडछाड, चोरी, चेन स्नॅचिंग आदी प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोणंद शहरात बस स्थानक, रेल्वे स्टेशन, पालखीतळ आदी 12 ठिकाणी खासगी व शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. खासगी वेशात पाच पोलिस अधिकारी व 50 पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. पालखी तळ व शहरात विविध ठिकाणी वॉच टॉवर उभारले असून त्या ठिकाणी दिवस-रात्र पाळीसाठी पोलिस कर्मचारी नेमले आहेत. वाहतुकीच्या सर्व मार्गावर बदल केले आहेत. नागरिकांच्या संशयास्पद, बेवारस वस्तू, बॅगा आढळून आल्यास त्याबाबत लगेच पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करून संपूर्ण परिसरात जागोजागी फ्लेक्‍स बोर्ड, जाहिरात पत्रके लावून जागृती केली आहे. पालखी काळात आजूबाजूच्या खेड्यातून माउलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची जाता-येताना रस्त्यात लूटमार तसेच बंद घर फोडून चोऱ्यांचे प्रकार घडू नयेत यासाठी दिवस-रात्र गस्तीसाठी पोलिसांची मोबाईल व्हॅनसह 12 पथके तैनात ठेवली आहेत. वॉकीटॉकीसह गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी शासकीय मोटारसायकलसह अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे.

दर्शनाचा लाभ शिस्तीने घेण्याचे आवाहन
पालखी सोहळ्याचा येथे या वर्षी एकच मुक्काम आहे. त्यामुळे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पालखी तळावर बांबूच्या साहाय्याने दोन ऐवजी चार दर्शन रांगा तयार करण्यात येणार आहेत. लोणंद व खंडाळा बाजूकडून येणारे भाविक या चारही रांगांचा वापर करतील. त्यात महिला व पुरुषांच्या प्रत्येकी दोन रांगा केल्या आहेत. त्यामुळे होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे शक्‍य होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचे पावित्र्य,धार्मिकता जोपासत दर्शनबारीत धक्काबुक्की व रेटारेटी न करता शिस्तीने दर्शनाचा लाभ घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे व लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी केले आहे.

Web Title: palakhi 4 Stay base secure by police