वाल्ह्याचा पालखी विसावा ओटा जमीनदोस्त

किशोर कुदळे
मंगळवार, 3 जुलै 2018

वाल्हे : आळंदी ते पंढरपुर पालखी महामार्गावरील सर्वच पालखी तळ अद्ययावत करून त्या ठिकाणी वारकऱ्यांना अत्यावश्यक सोई सुविधा निर्माण करून देताना पालखी तळाचे सुशोभिकरण करण्याचा पथदर्शी प्रकल्प वाल्हे (ता.पुरंदर) येथे सुरु आहे. शासनाचे यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत. असे असताना सोहळा समितीच्या नाराजीनंतर येथील पालखी विसावा ओटा माती मुरूम टाकून बुजविण्यात आल्याने या पथदर्शी प्रकल्पालाच भ्रष्टाचाराची लागण झाल्याने हे लाखो रुपये मातीत गेले असल्याचे अधोरेखीत झाले आहे. 

आषाढी वारीसाठी आळंदी ते पंढरपुर जाणारा वैष्णवांचा मेळा ठिकठिकाणी मुक्काम करीत मार्गक्रमण करीत असतो. या सोहळ्यास मुक्कामाच्या ठिकाणी सोई सुविधा मिळाव्यात याकरिता राज्यशासनाच्या वतीने या पालखी महामार्गावरील सर्वच पालखी तळांचा विकास करण्याचे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. सर्वच पालखी तळ एक सारखे असावेत या उद्देशाने सोहळा समिती, वारकरी यांच्या सुचनांचा विचार करून हे पालखी तळ विकासाचे काम केले जाणार होते. मात्र जिल्हा प्रशासनाने कोणतीही पारदर्शकता न ठेवता मनमानी पद्धतीने काम केल्याने यातील कामांचा निकृष्ठ दर्जा नुकताच समोर आला आहे.

नुकतेच पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालखी सोहळा समितीने वाल्ह्यातील तळाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करून या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा देखील दिला होता. अखेर वाल्हे पालखी तळावर एका कोपऱ्यात बांधण्यात आलेला पालखी विसाव्याचा ओटा माती आणि मुरूम टाकून बुजविण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली. मात्र आतापर्यंत या ठिकाणी खर्च करण्यात आलेले लाखो रुपये मातीखाली गेल्याने पालखी तळांच्या विकासाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत बोलताना पुरंदर 'रिपाइं'चे कार्याध्यक्ष पंकज धिवार म्हणाले की, वाल्हे येथील पालखी तळाचा हा पथदर्शी प्रकल्पच सुरुवातीपासून वादात सापडला असल्याने इतर तळांच्या विकासाबद्दल शंका निर्माण होत आहे. या तळाचा विकासक कोण आहे ? कामाचे स्वरुप काय आहे? कोणत्या कामावर किती रक्कम खर्च केली जाणार आहे? या कामाचा आराखड्याबद्दल ना ग्रामपंचायतीला माहिती ना येथील कामगारांना त्यामुळे या कामात खुप मोठा आर्थिक गैर व्यवहार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. याबद्दल प्रशासनास आपण जाब विचारणार असून काल वाल्हे पालखी तळावरील उध्वस्थ केलेला विसावा ओटा त्याचेच प्रतिक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: palkhi road is in bad condition