गुलालात न्हाऊन निघाला डोंगरमाथा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

ढेबेवाडी - "चांगभलं'च्या गजरात, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत श्री नाईकबा देवाच्या यात्रेतील पालखी सोहळा आज भक्‍तिमय वातावरणात झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संपूर्ण परिसर गुलालाने माखल्याने डोंगरमाथ्यावर जणू भक्तीची गुलाबी फुले उमलल्याचा भासच यानिमित्ताने होत होता. 

ढेबेवाडी - "चांगभलं'च्या गजरात, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत श्री नाईकबा देवाच्या यात्रेतील पालखी सोहळा आज भक्‍तिमय वातावरणात झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संपूर्ण परिसर गुलालाने माखल्याने डोंगरमाथ्यावर जणू भक्तीची गुलाबी फुले उमलल्याचा भासच यानिमित्ताने होत होता. 

बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेसाठी प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली होती. काल श्रींच्या नैवद्याचा दिवस असल्याने पहाटेपासूनच भाविक यात्रास्थळी येण्यास सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत हालगी आणि ढोल ताशांच्या गजरात भाविक सासनकाठ्या घेऊन मंदिराकडे दाखल होत होते. सकाळी पावणेसहा वाजता गुलालाच्या उधळणीत पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. मानाच्या सासनकाठीसह विविध भागातून आलेल्या सासनकाठ्या त्यामध्ये सहभागी झाल्या. "चांगभल'च्या गजराने सारा परिसर दणाणून निघाला. 

पालखी सोहळ्यानंतर देवदर्शन करून यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू झाला. यात्रेनिमित्त बनपुरी आणि जानुगडेवाडीत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यात्रास्थळी मेवा-मिठाई, खेळणी, स्टेशनरी, पूजेचे साहित्य, थंडपेये आदींच्या दुकानांची मोठी रेलचेल होती. विविध एसटी आगारांनी जादा बसची व्यवस्था केली. त्याशिवाय खासगी वाहनेही मोठ्या प्रमाणात आली होती. अनेक महाविद्यालयीन युवकांनी यात्रेत स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे काम केले. 

मंदिर परिसरात दर्शन रांगांसाठी बॅरिकेट्‌स लावण्यात आल्याने भाविकांना शिस्तबध्द दर्शनाचा अनुभव आला. उन्हामुळे भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून कारपेटही अंथरण्यात आले होते. 

आठ संशयितांवर कारवाई... 
यात्रेतील गर्दीत घुसलेल्या आठ संशयितांना सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी ही कारवाई करण्यात आली. हे सर्व संशयित परजिल्ह्यातील आहेत. गर्दीचा गैरफायदा उठवून भाविकांच्या खिशावर आणि दागिन्यांवर डल्ला मारण्यासाठी ते आले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. त्यांच्याजवळ विविध यात्रांच्या ठिकाणांची यादी सापडल्याने पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. 

Web Title: palkhi sohala in dhebewadi