पलूस शहर ‘मॉडेल’ करण्याची जबाबदारी

पलूस शहर ‘मॉडेल’ करण्याची जबाबदारी

पलूस - पलूस पालिकेची पहिली निवडणूक झाली. आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पालिकेवर पहिला झेंडा फडकवला आहे. आता खरी जबाबदारी आहे ती निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांची. पलूसला मॉडेल शहर करण्याची जबाबदारी नवीन कारभारी कसे पेलतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. 

पलूस पालिकेच्या पहिल्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता होती. काँग्रेस, भाजपा, स्वाभिमानी विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी पंचरंगी लढत झाली. त्यामध्ये काँग्रेसने नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या १७ पैकी १२ जागा जिंकून पालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले. रयत विकास आघाडीला ४, तर भाजपाला १ जागा मिळाली. 

पालिकेवर पहिला काँग्रेसचा तिरंगा फडकला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते व निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक यांची जबाबदारी वाढली आहे. पलूस शहरात अनेक प्रश्‍न आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्व प्रभागात स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. खरोखरच पलूस व वाड्यावस्त्यांवर पिण्याचे पाणी मिळत नाही. वर्षभरातून अनेक दिवस नळपाणीपुरवठा योजनाच बंद असते. त्यामुळे स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना तयार करणे हे प्रमुख काम नूतन कारभाऱ्यांना करावेच लागणार आहे.

याशिवाय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शहरांसह वाड्यावस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविणे, दर्जेदार रस्ते तयार करणे, जागतिक दर्जाचे पं. विष्णू दिगंबर पलूसकर यांचे स्मारक बांधणे, स्मशानभूमी, क्रीडासंकुल, ग्रंथालय, व्यायामशाळा सुरू करणे, कुस्ती संकुल नगरपालिका इमारत व व्यापारी संकुल बांधणे, अशी विविध आश्‍वासने काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या स्वप्नातील पलूस शहर महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे जाणवणारे मॉडेल शहर म्हणून विकसित करण्याची मोठी जबाबदारी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यावर आहे. त्यामध्ये वाढीव गावठाण, शहराच्या दक्षिणेस नियोजीत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनचा पाठपुरावा करणे, गुहागर- विजापूर महामार्गासाठी पाठपुरावा करणे, शहराच्या उत्तरेस असणारे खासगी व्यवस्थापित विमानतळ संयुक्‍तरीत्या करून विकसित करणे, औद्योगिक वसाहतीसाठी सुविधा देऊन, उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणे.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे आवश्‍यक 
पलूस शहराची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे आवश्‍यक आहे. पार्किंग व्यवस्था, आठवडा बाजार व्यवस्थापन, नगरपालिका शाळांचा दर्जा सुधारणे, अशी अनेक कामे पलूस शहर-मॉडेल शहर करण्याच्या दृष्टीने नूतन कारभाऱ्यांना करावी लागणार आहेत. तसे आश्‍वासन निवडणूक जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने दिले आहे. त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com