जिल्हाभर आचारसंहितेने हलकल्लोळ..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

सांगली - पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्हाभर लागू केल्यामुळे एकच हलकल्लोळ माजला आहे. या निवडणुकीपाठोपाठ सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची आचार संहिता लागू होणार असल्याने नेते अस्वस्थ आहेत. विकासकामांच्या रथाचे चाक रुतल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या खासदार, आमदारांनी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. आचारसंहिता जिल्हाभर का, याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.  

सांगली - पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्हाभर लागू केल्यामुळे एकच हलकल्लोळ माजला आहे. या निवडणुकीपाठोपाठ सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची आचार संहिता लागू होणार असल्याने नेते अस्वस्थ आहेत. विकासकामांच्या रथाचे चाक रुतल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या खासदार, आमदारांनी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. आचारसंहिता जिल्हाभर का, याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.  

महापालिकेची निवडणूक या महिन्याच्या अखेरपर्यंत  जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्याआधी सत्ताधारी  काँग्रेस आणि राज्यातील सत्ताधारी भाजपकडून विविध विकासकामांसह ‘भेटवस्तू’ वाटपाचा धडाका लावण्याचे नियोजन केले होते. त्यावर विरझन पडले आहे. सर्वपक्षियांत अस्वस्थता आहे. निवडणुकीचे क्षेत्र पलूस, कडेगाव या दोन  तालुक्‍यांपुरते मर्यादित असले तरी आचारसंहिता १० तालुक्‍यांसाठी लागू करण्यात आली आहे. ती ३३ दिवस चालणार आहे. 

आचार संहिता काळात विना परवाना पोस्टर्स, बॅनर्स प्रसिद्धाला बंदी आहे. राजकीय पक्षांना पूर्व परवानगी शिवाय बैठका घेता येणार नाहीत. नवीन कामांच्या प्रारंभ करण्यास मनाई आहे. भूमिपूजन, उद्‌घाटनही करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश आहेत. त्याचा जिल्हाभरातील कामांवर परिणाम झाला आहे. आता महापालिकेची आचारसंहिता जिल्हाभर लावली तर काय? या प्रश्‍नानेही सारे अस्वस्थ आहेत. 

ही काय भानगड?
मिरज पूर्व भागातील एका गावात छोटी यात्रा सुरू होती. रात्री आर्केस्ट्रा सुरू होता. त्याचे चित्रीकरण एका महाभागाने पोलिसांना पाठवले. त्यामुळे संयोजकांवर गुन्हा दाखल झाला. पोलिस आल्यावर लोकांनी विचारले, ‘‘आचार संहिता, ही काय भानगड?’’

उन्हाळ्यात रस्त्यांसह अनेक विकास कामे मार्गी लावायची असतात. मंजुरी कामांची सुरवात होत असते, आता त्या साऱ्याला खो बसला आहे. ही आचारसंहिता पलूस-कडेगावपुरतीच राहिली पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जे सुरू आहे, त्याने जिल्ह्यात मोठे नुकसान होतेय.
- संजय पाटील, खासदार

पंचवार्षिक निवडणुकांसाठी आचारसंहितेची जिल्हाभर व्याप्ती ठीक आहे, पोटनिवडणुकीला गरज नाही. शेजारी कोल्हापूर, कऱ्हाडला धोरणात्मक निर्णयाची घोषणा चालते, मग सांगलीत अडचण काय? मोठा फटका पाणी योजनांना बसतोय. या प्रकारच्या आचारसंहितेला माझा पूर्ण विरोध आहे.
- अनिल बाबर, आमदार

पलूस-कडेगावसाठी एक महिना आणि महापालिकेसाठी एक-दीड महिना आचारसंहिता राहिली तर कामे कधी करायची? सांगली मतदार संघात कित्येक कामे मंजूर आहेत, ती सुरू करता येणार नाहीत. हे सारे चुकीचे  आहे. विकासकामांना मोठा फटका बसला आहे.
- सुधीर गाडगीळ, आमदार

Web Title: palus-kadegaon vidhansabha election code of conduct