पंचगंगा घाटावरचा बावीसशे वर्षांपूर्वीचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

पंचगंगा घाटावर सकाळी सव्वासातला या उपक्रमाला प्रारंभ झाला. सकाळी घाटावर पोहायला आलेल्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, अभ्यासक, विविध प्रकारचे संशोधन करणारे विद्यार्थी आणि अगदी शाळकरी मुलेही या उपक्रमात सहभागी झाली.

कोल्हापूर - पंचगंगा घाट म्हणजे करवीरचा जन्म जिथे झाला, तो परिसर. बावीसशे वर्षांपूर्वी याच परिसरात कोल्हापूर वसलं होतं आणि त्याचे अवशेष आजही मिळतात. घाट परिसरातील मंदिरे पाहिली, की हजारो वर्षांपूर्वी येथे शिल्पकला किती विकसित होती. हे प्रकर्षाने जाणवते. हाच सारा दडलेला इतिहास आज कोल्हापूरकरांसमोर पुन्हा उलगडला. निमित्त होते, सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने हेरिटेज वीकच्या निमित्ताने झालेल्या "हेरिटेज वॉक' उपक्रमाचे. दरम्यान, प्रसिद्ध मूर्ती व मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर यांनी विविध प्राचीन ग्रंथातील दाखले देत हा सारा इतिहास उलगडला. 

पंचगंगा घाटावर सकाळी सव्वासातला या उपक्रमाला प्रारंभ झाला. सकाळी घाटावर पोहायला आलेल्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, अभ्यासक, विविध प्रकारचे संशोधन करणारे विद्यार्थी आणि अगदी शाळकरी मुलेही या उपक्रमात सहभागी झाली. घाट आणि एकूणच परिसराला असलेला सारा धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक इतिहास या वेळी उलगडत गेला.

राजघराण्यातील व्यक्तींची स्मृती मंदिरे

शहराच्या वायव्येस पंचगंगा नदीकाठी बांधलेला हा विस्तीर्ण घाट. घाटाच्या सभोवताली व प्रत्यक्ष नदीपात्रात अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. राजघराण्यातील व्यक्तींची स्मृती मंदिरेही येथे आहेत. त्याची स्थापना कशी झाली, बांधकामाची वैशिष्ट्ये या वेळी सर्वांनी जाणून घेतली. परिसरातील सर्वात मोठे व सुंदर देवालय म्हणजे श्री छत्रपती तिसरे शिवाजी यांचे. या मंदिरावरील नक्षीकामाने तर साऱ्यांनाच भुरळ घातली. एरवी पंचगंगा घाट आणि परिसरातील चित्रण अनेक सिनेमातून दिसते. मात्र, हा परिसर आपल्याच शहरात असल्याची माहितीही काही जणांना नव्यानेच समजली. 

राजघराण्यातील व्यक्तींची स्मृती मंदिरे

पंचगंगा नदीचे चंद्रकोरीसारखे वळण ही एक नैसर्गिक देणगीच असून त्या भौगोलिक वैशिष्ट्याच्या आधारेच शहर वसले. दोनशे वर्षांपूर्वीही उत्कृष्ट शिल्पकला शहरात विकसित होती, हे समाधी मंदिरांची रचना पाहताना आवर्जुन लक्षात येते तर अगदी बाराव्या शतकात विरगळांसाठीची प्रगत शिल्पकलाही शहरात विकसित असल्याचे जाणवते. तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी आणि सरस्वती या पाच नद्यांचा संगम म्हणजे पंचगंगा. या पाचही नद्यांच्या नावाच्या देवतांचे मूर्तीशिल्प अंबाबाई मंदिरात आहे तर अगदी तेराव्या शतकातील एका ग्रंथात अंबाबाई दर्शनापूर्वी अगोदर पंचगंगा नदीचे दर्शन घेण्याचा नियम नोंद असल्याचेही यावेळी उमाकांत राणिगा, प्रसन्न मालेकर यांनी सांगितले. विवेकानंद महाविद्यालय, न्यू कॉलेज यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले. 

इतिहासाला पुन्हा उजाळा मिळावा हा उद्देश

""कोणतेही शहर हे नदीच्या काठावर वसते आणि त्यामागचा इतिहासही वेगळा असतो. त्यातही कोल्हापूरला प्राचीन इतिहास आहे. या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळावा, नव्या पिढीला तो माहिती व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन झाले.''

-  श्रीराम पवार, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक

दरम्यान, "सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर आदी उपस्थित होते. मुख्य बातमीदार सुधाकर काशीद यांनी प्रास्ताविक केले. 

विद्यार्थ्यांसाठी उद्या उपक्रम 

"सकाळ'च्या पुढाकाराने सोमवारी (ता. 25) शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम होणार आहे. टाऊन हॉल येथील कोल्हापूर वस्तू संग्रहालय विद्यार्थ्यांना मोफत दाखवले जाणार आहे. यानिमित्ताने प्राचीन कोल्हापूरची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बावीसशे वर्षांपूर्वी कोल्हापुरात मातीची भांडी कशी होती, आरशांना पंचधातूंच्या फ्रेमची सजावट कशी होती, ब्रम्हापुरी उत्खननात सापडलेले विविध प्राचीन अवशेष याबरोबरच विविध प्राचीन वस्तू येथे पहायला मिळणार आहेत. 

हेही पाहा - इतिहासप्रेमींनो...पन्हाळागड ढासळतोय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchaganga Ghat 22oo Years History Sakal Event