सोलापूर बाजार समितीत आर्थिक गुन्हे शाखेकडून पंचनामे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

बाजार समितीमध्ये 2011 ते 2016 या कालावधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह 37 जणांवर 22 मे रोजी जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 39 कोटी सहा लाख 39 हजार 193 हजारांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचनामे करण्यास सुरवात केली आहे. बाजार समितीमधील अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात येत आहे. 

बाजार समितीमध्ये 2011 ते 2016 या कालावधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह 37 जणांवर 22 मे रोजी जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी जेलरोड पोलिसांत तक्रारी अर्ज दिला होता. पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी करून 37 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बाजार समितीत 1 एप्रिल 2011 ते 17 ऑक्‍टोबर 2011 या कालावधीत 14 समिती सदस्य, एक सचिव आणि 18 ऑक्‍टोबर 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत 20 समिती सदस्य आणि दोन सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

संचालकांनी निर्णय घेतले असले तरी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. नियमबाह्य जागावाटप केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या पथकाने मोजपट्टी घेऊन गाळ्यांची मोजणी केली आहे. 

सत्तेचा दुरुपयोग केल्याचे काँग्रेसचे म्हणणे -
राजकीय सूडभावनेने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवर राजकीय दबाव आणून सत्तेचा दुरुपयोग करून गंभीर कलमांचा वापर करण्यात आल्याचे निवेदन कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांना देण्यात आले. या वेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, दक्षिण सोलापूर अध्यक्ष गुरुनाथ म्हेत्रे, माजी सभापती भीमाशंकर जमादार, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, माजी सभापती बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. 

बाजार समितीमधील गैरव्यवहारप्रकरणी पंचनामे करण्यात येत आहेत. संचालकांच्या निर्णयांची अंमलबजावणी करणाऱ्या बाजार समितीच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. 
- शर्मिष्ठा वालावलकर, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा 

लोकशाहीत सत्तेचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे. लोकप्रतिनिधींना जेरीस आणण्यासाठी गुन्ह्यात चुकीचे कलमे लावली आहेत. अन्यायकारक कलमे रद्द करण्यात यावीत. 
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, काँग्रेस

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Panchanama from the Economic Offenses Wing in Solapur Market Committee